• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

‘मायक्रो-कॉन्शिओ क्रांती’संविधानाला आतून जागं करणारी नवी जनचळवळ

ByMirror

Nov 26, 2025
‘मायक्रो-कॉन्शिओ क्रांती’संविधानाला आतून जागं करणारी नवी जनचळवळ

चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनने संविधान दिनाच्या दिवशी निर्धार


समता, बंधुता, स्वातंत्र्य मूल्यांचे पुनर्जागरण हेच या क्रांतीचे ध्येय -ॲड. कारभारी गवळी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक असे अनेक बदल होत असतानाही सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाची उणीव जाणवत आहे. प्रत्येक भारतीयाच्या अंतर्मनात घडणारी शांत पण प्रभावी जागृतीची ‘मायक्रो-कॉन्शिओ क्रांती’ चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनने संविधान दिनाच्या दिवशी निर्धार व्यक्त केला आहे.


समाजाच्या बाह्य स्वरूपातील बदलांवर भर दिला गेला, पण मानसिकता आणि वृत्तीमध्ये परिवर्तन घडविण्याचे प्रयत्न अपुरे राहिले, असा निष्कर्ष ‘मायक्रो-कॉन्शिओ क्रांती’ या नव्या सामाजिक संकल्पनेतून व्यक्त करण्यात आला आहे. ही क्रांती रस्त्यावरच्या घोषणांची नाही, राजकीय आंदोलनांची नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या अंतर्मनात घडणारी चळवळीसाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


या क्रांतीचा मुख्य आधार असलेला ‘मायक्रो-कॉन्शिओ’ म्हणजे माणसाच्या आतला सजग विवेक, जो निर्णय घेताना योग्य-अयोग्याचा आवाज देतो. हा आवाज “चुकीचं करू नकोस, योग्यतेसाठी पुढे ये, शत्रू समजू नको, तोही माणूस आहे, तुझी शक्ती सेवा करण्यासाठी आहे, असा मार्गदर्शन करणारा अंतर्मनाचा दीप आहे. हा मायक्रो-कॉन्शिओच लाच न घेऊ देतो, समानतेचे संस्कार देतो, जातधर्माच्या भिंती कमी करतो, आणि दुसऱ्याच्या दु:खाकडे उदासीनता सहन करत नाही.


मायक्रो-कॉन्शिओ क्रांती कोणत्याही धर्म, जाती किंवा पक्षाविरुद्ध नसून स्वतःमधील लोभ, राग, अहंकार आणि भीतीविरुद्ध आहे. ही क्रांती म्हणजे स्वतःवर विजय मिळवण्याची, मनाला बदलण्याची आणि समाजाला आतून शुद्ध करण्याची चळवळ आहे. संविधान आणि मायक्रो-कॉन्शिओ एकच ध्येय, एकच मार्ग असून, भारतीय संविधान न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये जपते. परंतु हे मूल्य फक्त कायद्याने नाही तर अंतर्मनाच्या शुद्धतेने जिवंत राहत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


बाहेरचा कायदा तेव्हाच शक्तिशाली होतो, जेव्हा आतला मायक्रो-कॉन्शिओ जागृत असतो. मायक्रो-कॉन्शिओ क्रांतीला “संविधानाला जिवंत करणारी आंतरिक शपथ” असेही संबोधले जात आहे. क्रांतीची सुरुवात मोठ्या सभा नाहीत; दोन साधे प्रश्‍न पुरेसे आहे. प्रत्येक सकाळी स्वतःला विचारायचे दोन प्रश्‍न यातून ही क्रांती सुरू होते. आज मी प्रामाणिक राहणार का? व आज मी प्रत्येकाला माणूस म्हणून वागवणार का? या छोट्या कृती समाजातील मोठ्या बदलांची पायाभरणी होणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.


घरी स्त्री-पुरुष समान हक्क, वृद्धांचा सन्मान, मुलांना नीतीचे मूल्य, कामावर लाच न घेणे, संधींची समानता, रस्त्यावर नियम पाळणे, गरजूंना मदत, मतदान करताना जातधर्म नव्हे; काम, प्रामाणिकता आणि राष्ट्रहित पाहणे. कोट्यवधी मायक्रो-कॉन्शिओ जागे झाल्यास या चळवळीच्या समर्थकांचे मत आहे की, भ्रष्टाचार कोसळेल जात-धर्माच्या भिंती वितळतील, द्वेषहिंसा स्वतःहून नष्ट होईल, न्याय सर्वांपर्यंत पोहोचेल. नेता सत्तेसाठी नव्हे, सेवेसाठी धावेल. ही क्रांती नारेबाजीची नसून शांत, नि:स्वार्थ आणि वैयक्तिक परिवर्तनाची सामूहिक शक्ती असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *