• Mon. Jun 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

नागरी सुविधांच्या वाताहातीच्या निषेधार्थ दिल्लीगेट वेस समोर महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन

ByMirror

Oct 2, 2024
नागरी सुविधांच्या वाताहातीच्या निषेधार्थ दिल्लीगेट वेस समोर महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन

खड्डेच खड्डे, धुळीचा फुफाटा, वीज आणि पाणी प्रश्‍नाची बकाल अवस्था टांगली वेशीवर

पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार; नागरी सुविधांसाठी केली निदर्शने

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात रस्त्यावर पडलेले खड्डेच खड्डे, धुळीचा फुफाटा, अवेळी गायब होणारी वीज आणि दोन हंडे शुध्द पाण्यासाठी नागरिकांची वणवण या नागरी सुविधांच्या प्रश्‍नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि.02 ऑक्टोबर) महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त दिल्लीगेट वेस समोर पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन करण्यात आले. प्रशासनातील भ्रष्टाचार व टक्केवारीमुळे शहराची बकाल अवस्थेचे स्वरुप दिल्लीगेटच्या वेशीवर टांगण्यात आले.


आंदोलनाच्या प्रारंभी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करुन नागरी सुविधांची झालेल्या वाताहातीचा निषेध नोंदवला. या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ॲड. सुरेश लगड, अशोक भोसले, रईस शेख, सतीश पापडीजा, अशोक डाके, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, सलीम मिर्झा, पोपट भोसले, अंतोन गायकवाड, विजय शिरसाठ, बाबासाहेब पालवे, ओम कदम आदींसह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.


शहरामध्ये गेली अनेक दशके प्रत्येक रस्त्याला खड्डेच-खड्डे आहेत. सत्ताधारी टक्केवारीच्या माध्यमातून विकास कामांचा मोठा निधी खाऊन टाकतात. त्यातूनच सत्तापेंढारी पुन्हा-पुन्हा सत्तेत येतात. नागरिकांच्या उदासीनपणामुळे आणि मतदानाच्या वेळेला जात आणि पैशाच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात मतदान सत्तापेंढारी मिळवतात. यामुळे मागच्या दाराने सत्ता काबीज करण्यास सत्तापेंढारी यशस्वी होत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.


ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, शहरातील रस्त्यांची परिस्थिती स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्षात बदलू शकलेली नाही. एकंदरीत महानगरपालिका म्हणजे लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीशी फारकत घेतलेले सत्तापेंढारी आणि नोकरशाहीच्या माध्यमातून सातत्याने शोषक आणि भ्रष्टाचारी यंत्रणा टिकून राहिली असल्याचा आरोप त्यांनी केला.


अशोक सब्बन म्हणाले की, शहरात अनेक वेळेस विज गायब होते. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या दिव्यांच्या खांबावर अनेक धेंडानी बेकायदेशीर विजजोड घेऊन वर्षानुवर्षी चोरी सुरु ठेवलेली आहे. त्यातून 25 ते 30 टक्केच्या आसपास होणाऱ्या वीज चोरीचा भार कायदा मानणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर पडत आहे. एकंदरीत वीज कंपनीचे अधिकारी कोणाच्याही तक्रारीला दाद देत नाही. शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमित होतो. अनेक वेळेस ठरलेल्या दिवशी आणि वेळेवर नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका हद्दीत 30 ते 35 टक्के बेकायदेशीर कनेक्शन आहेत. त्याबाबत महापालिका कोणतीही कारवाई करत नाही. यासाठी पाणी, वीज व रस्त्यांसाठी पावीर सूर्यनामा आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सरकार, महापालिका आणि वीज कंपनी भ्रष्टाचाराने निगळंकृत केली असल्याचे आंदोलनाच्या वतीने जाहीर करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *