• Mon. Jun 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

ByMirror

Jun 22, 2024
निमगाव वाघात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

विद्यार्थी, युवक-युवतींनी केली योगासने

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयाच्या मैदानावर शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे प्रात्यक्षिकासह देण्यात आले. योग दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी, युवक-युवती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


या योग शिबीरात उद्योजक तथा योग शिक्षक बाळासाहेब शहाणे यांनी उपस्थितांना योग व प्राणायमाचे धडे दिले. विविध आसन प्रात्यक्षिकासह करुन, त्याचे महत्त्व विशद केले. तर योग, प्राणायम व ध्यान धारणेबद्दल माहिती देवून निरोगी जीवनासाठी योग व प्राणायाम करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना सकस आहाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, मयुरी जाधव, तेजस केदारी, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, लहानू जाधव, भानुदास लंगोटे, प्रमोद थिटे, तेजस केदारी आदी उपस्थित होते.


पै.नाना डोंगरे यांनी निरोगी जीवनासाठी योग व प्राणायाम महत्त्वाचा आहे. गावाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम व योग करण्याची गरज आहे. निरोगी जीवनासाठी भारताने संपूर्ण जगाला योगची देणगी दिली असून, योगाने सक्षम सदृढ पिढी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *