पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे देशासह परदेशातील भारतीयांनाही सहभागी होण्याचे आवाहन
“शांत राहणे म्हणजे लोकशाहीच्या मृत्यूला मूक संमती देण्यासारखे” -ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरणवादी, वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर केंद्र सरकारकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप करत, त्यांच्या समर्थनार्थ शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी देशभरातील तसेच परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी ‘एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन’ करावे, असे आवाहन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आले आहे.
हे आंदोलन हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात असून लोकशाही, संविधान, अहिंसा आणि नागरिकांच्या शांततामय आंदोलनाच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.
संघटनांच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, भ्रष्ट शैक्षणिक व्यवस्थेविरोधात सोनम वांगचुक यांनी अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला आहे. दीर्घकाळ उपोषण केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातूनही त्यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या आरोग्यावर वैद्यकीय तज्ज्ञांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक संवाद साधण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या मते, सोनम वांगचुक यांचा प्रश्न आता केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो भारतातील प्रत्येक नागरिकाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा, शांततामय आंदोलनाचा, अहिंसेचा आणि सत्याग्रहाच्या घटनात्मक अधिकाराचा प्रश्न बनला आहे.
लोकशाही व्यवस्थेत शासनाने विरोधी मतांचा आदर करून संवाद साधणे अपेक्षित असताना, शांततेच्या मार्गाने न्याय मागणाऱ्या नागरिकांवर पोलिसी बळाचा वापर करणे किंवा प्रशासकीय दबाव आणणे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे संघटनांनी नमूद केले आहे.
२४ जुलैचे अन्नत्याग आंदोलन पूर्णपणे शांततामय, अहिंसक आणि संविधाननिष्ठ असेल. नागरिकांनी दिवसभर अन्नत्याग करून आपल्या गावात, शहरात, शैक्षणिक संस्थांमध्ये, सामाजिक संघटनांमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी सभा, चर्चासत्रे, प्रार्थना, लोकशाही जागृती कार्यक्रम आणि संविधान संरक्षणाचे उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने संवाद सुरू करावा, अशा आशयाचा ठराव या सभा-संमेलनांमध्ये मंजूर करावा, असेही संघटनांनी म्हटले आहे.
भारताबाहेर वास्तव्यास असलेल्या भारतीयांनीही आपापल्या देशांमध्ये लोकशाही आणि शांततामय मार्गाने कार्यक्रम आयोजित करून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, कामगार, शिक्षक, डॉक्टर, वकील, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, प्रवासी भारतीय संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
संघटनांनी केंद्र सरकारकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. सोनम वांगचुक यांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारावी, त्यांना सर्वोत्तम आणि पारदर्शक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, त्यांच्या कुटुंबीयांना उपचारांबाबत नियमित माहिती द्यावी आणि त्यांच्या आंदोलनामागील न्याय्य मागण्यांवर सन्मानपूर्वक व तातडीने चर्चा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
देशातील नागरिकांच्या शांततामय निदर्शनांवर, उपोषणांवर आणि सत्याग्रहांवर अनावश्यक निर्बंध लादू नयेत. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे, संघटना स्थापन करण्याच्या अधिकाराचे आणि अहिंसक आंदोलनाच्या अधिकाराचे शासनाने संरक्षण करावे, अशी भूमिकाही संघटनांनी मांडली आहे.
यावेळी पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी म्हणाले,
“२४ जुलै रोजी एक दिवस अन्नाचा त्याग करा; पण लोकशाहीचा, अहिंसेचा आणि सत्याचा त्याग करू नका. एका सत्याग्रहींचा जीव धोक्यात असताना शांत राहणे म्हणजे लोकशाहीच्या मृत्यूला मूक संमती देण्यासारखे आहे. अन्नत्यागातून आत्मबळ जागवून संविधानाच्या संरक्षणासाठी देशव्यापी लोकशक्ती उभी करण्याची हीच वेळ आहे.”
आंदोलनादरम्यान शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा उपक्रम संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी अहिंसा, सत्याग्रह आणि लोकशाही मार्गानेच राबविण्यात येणार असल्याचे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी कॉम्रेड बाबा आरगडे, ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ॲड. सुरेश लगड, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे,ॲड. ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
