बचत गटातील महिलांच्या विविध उत्पादनांचे थाटले स्टॉल; वीर माता, वीर पत्नींचा सन्मान
बचतगट चळवळीतून सामाजिक क्रांती घडणार -किशोर डागवाले
नगर (प्रतिनिधी)- बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, युवकांच्या कला-गुणांना चालना देण्यासाठी व विविध कार्यक्रमासह सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असलेल्या चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सवाचे उद्घाटन वीर माता, वीर पत्नींच्या हस्ते करण्यात आले.

सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यातील महिलांच्या विविध उत्पादनांचे विविध स्टॉल थाटण्यात आले आहेत. 9 ते 12 जानेवारी दरम्यान जय युवा अकॅडमी, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर महानगरपालिका, रयत प्रतिष्ठान, उडान फाउंडेशन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा रुग्णालय, शहर बार असोसिएशन, असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य आदींच्या सहयोगाने हा महोत्सव होत आहे. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी स्वागताध्यक्ष तथा माजी नगरसेवक किशोर डागवाले, महेंद्र (भैय्या) गंधे, ॲड. वाल्मीक (तात्या) निकाळजे, सिने कलाकर राजेंद्र गटणे, डॉ. दिलीप जोंधळे, सुहासराव सोनवणे, जयश्री शिंदे, दिनेश शिंदे, रजनी ताठे, आरती शिंदे, राजकुमार चिंतामणी, जयेश शिंदे, राजेंद्र उदागे, बाळासाहेब पाटोळे, वीर पत्नी लताताई वारुळे, संयोजक ॲड. महेश शिंदे, अनिल साळवे, आरती शिंदे, प्राचार्य संजय पडोळे, शाहीर कान्हू सुंबे, दिनेश शिंदे, अंबिका भोंदे, रामदास फुले, कांचन लद्दे आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
किशोर डागवाले म्हणाले की, महिला या समाजाचा आणि कुटुंबाचा कणा आहेत. कुटुंबाची आर्थिक घडी बसविण्याचे काम त्या करत असतात. महिला बचत गटातील उद्योगधंद्यांना चालना दिल्यास आर्थिक प्रगती साधली जाणार आहे. बचतगट चळवळीतून सामाजिक क्रांती घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर बचतगट चळवळीला नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे आश्वासन दिले.
ॲड. वाल्मीक (तात्या) निकाळजे म्हणाले की, पिझ्झापेक्षा आपलं पिठलं भाकरी हे जगतिक ब्रँण्ड ठरू शकते. यासाठी महिला बचत गटांनी पुढाकार घ्यावा. सकस व देशी खाद्यांच्या ब्रॅण्डसाठी बचत गट पुढे येत आहे. महिला बचत गटांच्या उद्योग धंद्याना चालना व बाजारपेठ मिळण्यासाठी सावित्री ज्योती महोत्सव एक उत्तम व्यासपीठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजेंद्र गटणे यांनी नगरकर नेहमीच काळजात असून, त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे सिनेक्षेत्रात स्व:ची ओळख निर्माण करता आली. अर्थकारणात महिलांचे मोठे योगदान आहे. जिच्या हातात तिजोरी, ती कुटुंब उध्दारी… असे सांगून महिलांच्या व्यावहारिक ज्ञानाचे त्यांनी कौतुक केले. प्रा. भगवान काटे यांनी इंटरनॅशनल बाजारपेठ लक्षात घेऊन बचत गटांच्या महिलांनी उत्पादने निर्माण करावी. ग्रामीण भागातून मोठे ब्रॅण्ड निर्माण होत असून, महिलांनी एकजुटी पुढे जाण्याचे आवाहन करुन त्यांना बचत गट संदर्भात मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात महोत्सवाचे संयोजक ॲड. महेश शिंदे यांनी दरवर्षी होणारे सावित्री ज्योती महोत्सव बचत गटातील महिलांच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्याचे काम करत आहे. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात लाखोची उलाढाल होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सोहळ्यात वीर माता, वीर पत्नी व जवानांच्या पत्नींनी झालेल्या दिलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले. तर सैनिकांची पत्नी व माता असल्याचे अभिमान असून, भावी पिढीत देशभक्ती रुजविण्याचे कार्य सैनिक कुटुंबीय करत आहे. कर्म म्हणून सैनिक देशसेवा करत असल्याचे सांगून, दिल दिया है …जान भी देंगे, ए वतन तेरे लिए! हे गीत त्यांनी सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रवीड यांनी केले. आभार सुहासराव सोनवणे यांनी मानले.
–—–
सावित्री ज्योती महोत्सवात वीर माता, वीर पत्नींचा सन्मान
या सोहळ्यात जिल्ह्यातील वीर माता, वीर पत्नीं तसेच जवानांच्या पत्नींना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.