• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

“भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये शिक्षण प्रसार जनजागृती अभियानाचा शुभारंभ”

ByMirror

Apr 13, 2026
‘विद्येविना मती गेली’ हा संदेश केवळ काव्य नसून, प्रगतीचा मूलमंत्र -डॉ. पारस कोठारी

महात्मा फुले जयंतीनिमित्त ‘रात्र शाळेत पुन्हा प्रवेश’ उपक्रम; शिक्षणदूत बजावणार महत्त्वपूर्ण भूमिका अर्धवट शिक्षण सोडलेल्यांना नवी संधी

‘विद्येविना मती गेली’ हा संदेश केवळ काव्य नसून, प्रगतीचा मूलमंत्र -डॉ. पारस कोठारी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी विशेष जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून विविध कारणांनी अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रात्र शाळेत पुन्हा प्रवेश देण्यावर भर देण्यात येणार असून, आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक ‘शिक्षणदूत’ म्हणून सक्रिय भूमिका बजावणार आहेत. समाजातील उपेक्षित व शिक्षणापासून वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.


कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. हा मान रात्र शाळेच्या चेअरमन ज्योतीताई कुलकर्णी व पेमराज सारडा कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्राचार्य सुनिल सुसरे, महादेव राऊत, अमोल कदम, उज्वला साठे,वृषाली, साताळकर, अनुराधा दरेकर, वैशाली दुराफे, बाळासाहेब गोरडे, शिवा शिंदे, कैलास करांडे, गजेंद्र गाडगीळ, मंगेश भुते, अशोक शिंदे, प्रशांत शिंदे, स्वाती होले, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे, आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका स्वाती किशोर अहिरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री नवनाथ विद्यालय, करंजी (ता. पाथर्डी) येथे कार्यरत आहेत.


ज्योतीताई कुलकर्णी म्हणाल्या की, पूर्वी महिला घरात कोंडलेली बाहुली होती. महात्मा फुले यांनी तिला शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सन्मान मिळवून दिला. महिलांवर लादलेल्या अन्यायकारक रुढी आणि परंपरा त्यांनी शिक्षणाच्या बळावर दूर केल्या. स्वतःच्या पत्नीला सुशिक्षित करून त्यांनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. ‘स्त्री शिकली तर समाज घडतो’ हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. ज्योतिबांचे ऋण कधीही फेडता येणार नसल्याचे त्या म्हणाल्या.


डॉ. पारस कोठारी म्हणाले की, महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजमनातील अंधकार दूर केला. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचा प्रारंभ हा ज्ञान, समता आणि मानवी हक्कांच्या लढ्याला मिळालेले मोठे यश आहे. ‘विद्येविना मती गेली’ हा त्यांचा संदेश केवळ काव्य नसून प्रगतीचा मूलमंत्र आहे. हिंद सेवा मंडळ त्यांच्या विचारांवर चालत असून, नाईट हायस्कूलच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत आहे. शिक्षण देऊनच थांबणार नाही, तर त्यांना समाजात सक्षमपणे उभे करण्याचे कामही केले जात आहे.”


जिल्हा परिषद शिक्षण विभाग व महानगरपालिका शिक्षण मंडळ यांच्या मार्गदर्शनाने गेली दोन वर्ष सतत या अभियानांतर्गत तीन गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे: पहिला गट: शिक्षणदूत म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या आजी माजी विद्यार्थी, दुसरा गट: वर्गशिक्षकांचा, जे आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त प्रवेश मिळवून देतील, तिसरा गट: शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जे वैयक्तिक संपर्कातून जनजागृती करतील. या तिन्ही गटांमधून रात्रशाळेत सर्वाधिक परिपूर्ण प्रवेश मिळवून देणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाच्या व्यक्तींना ट्रॉफी व सन्मानपत्र देण्यात येणार आहे व या स्पर्धेदरम्यान समाजातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, वकील हे देखील सामाजिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण प्रसार जनजागृती अभियान अंतर्गत रात्रशाळेत गरजवंत विद्यार्थ्यांचा किमान एक प्रवेश करणाऱ्या मान्यवरांना सन्मानपत्र देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य सुनिल सुसरे यांनी दिली. विशेष शालेय शिक्षण विभागाने रात्र शाळेतील इयत्ता अकरावी प्रवेश ऑफलाइन पद्धतीने ठेवल्याने गरजवंतांनी तात्काळ आपला प्रवेश निश्चित करण्याचे म्हटले आहे.


या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी, मानद सचिव संजय जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, अजित बोरा, अनंत फडणीस, डॉ. रमेश झरकर, आदी मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले, तर आभार गजेंद्र गाडगीळ यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *