महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आंदोलनाची दखल घेण्यासाठी वेधले लक्ष
शासन निर्णय निर्गमित करुन कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे -बाबासाहेब बोडखे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समग्र शिक्षा संघर्ष समितीने यशवंत स्टेडीयम, नागपूर येथे सोमवार (दि. 8 डिसेंबर) पासून सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाची तात्काळ दखल घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना पाठविले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
समग्र शिक्षेअंतर्गत मागील दोन दशकांहून अधिक काळ विविध संवर्गात कार्यरत जवळपास 6,483 उच्च शिक्षित कर्मचारी करार तत्त्वावर सेवा बजावत आहेत. शासन निर्णय (दि. 8 ऑक्टोबर 2024) नुसार यापैकी 3,105 कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे समायोजन कायम स्वरूपी शासन सेवेत करण्यात आले असले, तरीही अजूनही 3,378 वरिष्ठ कर्मचारी शासन समायोजनापासून वंचित असल्यामुळे असंतोष वाढत आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. 4 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयाव्दारे वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी अभ्यास समिती गठित केली होती. या समितीने शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार शालेय शिक्षण, ग्रामविकास आणि इतर विभागांतील समकक्ष रिक्त पदांची तपशीलवार समीक्षा करून समायोजन करण्यासंबंधी विस्तृत अहवाल शासनाकडे सादर केला.
मात्र या अहवालाचे अनुपालन करण्यासाठी आवश्यक असलेला शासन निर्णय अद्याप निर्गमित न झाल्याने 3,378 कर्मचाऱ्यांचे समायोजन अनिश्चिततेत आहे. या न्याय्य मागण्यांसाठी दि. 8 डिसेंबर 2025 पासून नागपूर येथील यशवंत स्टेडीयममध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर करून शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी म्हंटले आहे.
