• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यारंभ संस्कारातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात

ByMirror

Jun 20, 2026
संस्कारयुक्त शिक्षणातूनच सक्षम भारताची निर्मिती -आ. संग्राम जगताप

आमदार संग्राम जगताप यांची वही तुला


संस्कारयुक्त शिक्षणातूनच सक्षम भारताची निर्मिती -आ. संग्राम जगताप


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दरेवाडी (ता. नगर) येथील चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 ची सुरुवात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पारंपरिक विद्यारंभ संस्कार कार्यक्रमाने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत ज्ञानार्जनाच्या प्रवासाची सुरुवात भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि परंपरा जपत करण्यात आली.


या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांची वही तुला करण्यात आली. या उपक्रमातून जमा झालेल्या वह्या शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना वितरित केल्या जाणार असल्याने या कार्यक्रमाला सामाजिक सेवेचीही जोड देण्यात आली.
या सोहळ्याप्रंगी शाळेचे संचालक संजय चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सचदेव, प्राचार्य वैभवकुमार अग्रवाल, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन, प्रार्थना व सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. लहान विद्यार्थ्यांना अक्षरओळखीचा शुभारंभ करून ज्ञानाच्या मंदिरात नवीन शैक्षणिक वर्षासाठी पहिले पाऊले.


मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सचदेव म्हणाले की, “चित्रकुट इंटरनॅशनल स्कूल ही केवळ शैक्षणिक संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची कार्यशाळा आहे. आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, मूल्ये आणि जीवनदृष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य आम्ही सातत्याने करत आहोत. गेल्या चार वर्षांपासून विद्यारंभ संस्काराच्या माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली जाते. मुलांमध्ये लहानपणापासूनच गुरूजनांविषयी आदर, ज्ञानाविषयी श्रद्धा आणि राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी हा या उपक्रमामागील उद्देश आहे.”


ते पुढे म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुण मिळविणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, शिस्त, सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित होणे आवश्‍यक आहे. शाळा याच दृष्टीने विविध उपक्रम राबवत असून प्रत्येक विद्यार्थी हा जबाबदार नागरिक म्हणून घडावा यासाठी प्रयत्नशील आहे.”


प्राचार्य वैभवकुमार अग्रवाल म्हणाले की, “शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया आहे. संस्कारातून घडलेला विद्यार्थीच उद्याचा सक्षम नागरिक आणि राष्ट्रनिर्माता ठरतो. चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच नैतिक मूल्यांची जपणूक करण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास, सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि सामाजिक उत्तरदायित्व विकसित करण्यासाठी विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजाप्रती संवेदनशीलता आणि कर्तव्यभावना निर्माण करणे हीच खरी शिक्षणाची दिशा असल्याचे ते म्हणाले.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान आणि ज्ञानाची कास धरणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची रुजवण करणेही आवश्‍यक आहे. चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलने विद्यारंभ संस्कारासारख्या उपक्रमातून शिक्षण आणि संस्कृती यांचा सुंदर संगम साधला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परंपरेविषयी अभिमान निर्माण होतो.”


ते पुढे म्हणाले, “गरजू विद्यार्थ्यांसाठी वही तुला उपक्रम राबवून शाळेने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण दिले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. शिक्षण हेच जीवनातील प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन असून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी प्रामाणिक परिश्रम करावेत. अशा संस्कारक्षम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांमुळेच देशाचा भविष्यकाळ अधिक उज्ज्वल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेचे संचालक संजय चव्हाण यांच्या संकल्पनेतून वही तुलाचा कार्यक्रम राबविण्यात आला असून, शहरातील गरजू घटकातील विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *