लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप; माजी विद्यार्थी संघाच्या सदस्य थोरात व गायकवाड यांचा पुढाकार
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण प्रणाली बदलत आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांची मानसिकता आणि भविष्यातील गरज अोळखून अभ्यासक्रमात बदल करावा लागणार आहे. पिढी लहानपणापासूनच सक्षम झाली पाहिजे, यासाठी अभ्यासक्रम बदलण्याची गरज असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
शहरातील कापड बाजार परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी विद्यार्थी संघाच्या सदस्या सोनाली थोरात, सुशील थोरात, सार्थक थोरात आणि जितेंद्र दत्तात्रय गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, माजी नगरसेवक संजय चोपडा, स्कूल कमिटी सदस्य शिवाजीराव विधाते, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांच्यासह पालक प्रतिनिधी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, शिक्षणाचे उद्देश्य एकच असले पाहिजे की, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे. चांगला विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षणातून होत असताना त्यांना शैक्षणिक साहित्यातून हातभार लागणार आहे. या ध्येयाने घेण्यात आलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे. यामागील मदतीची भावना महत्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर शाळेच्या कोणत्याही कमिटीवर घेण्याची अपेक्षा नाही, फक्त अडचणी सांगा ते सोडवून देण्याचे काम मी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या वतीने तसेच परिवहन समितीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात ज्ञानदेव पांडुळे यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती जपलेली बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पिसाळ यांनी केले, तर आभार महादेव भद्रे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शालेय शिक्षकांनी परिश्रम घेतले.

