• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

उपवनसंरक्षक कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात गुरुवारी अन्नत्याग व हलगी नाद आंदोलन

ByMirror

Aug 13, 2025
उपवनसंरक्षक कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात गुरुवारी अन्नत्याग व हलगी नाद आंदोलन

गंभीर तक्रारींवर चौकशी थांबवून भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी; रघुनाथ आंबेडकर यांचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील उपवनसंरक्षक कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, नियमबाह्य बदली आणि गंभीर वन्यजीव हत्येच्या प्रकरणातील चौकशीला विलंब केल्याचा आरोप करत जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन या संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. 14 ऑगस्ट) अहिल्यानगर उपवनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग व हलगी नाद आंदोलन होणार आहे. हे आंदोलन संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब काबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


30 मे 2025 रोजी उपवनसंरक्षक यांनी 61 वनरक्षकांच्या नियमबाह्य बदल्या केल्या. शासन निर्णयाचे उल्लंघन व भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून 30 जून 2025 रोजी नाशिक येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर जी. मल्लिकार्जुन, मुख्य वनसंरक्षक यांनी चौकशीसाठी माळी यांची नियुक्ती करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्याप चौकशी पार पडलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.


मौजे माथणी (ता. जि. अहिल्यानगर) येथे बिबट्याची निर्घृण हत्या करून पंजे व मिशा उपटण्याच्या प्रकरणात त्यांनी लेखी तक्रार दिली होती. या प्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी व सहायक वनसंरक्षक यांच्या चौकशीचा अहवाल किंवा चौकशी केली नाही, असा लेखी खुलासा अद्याप मिळालेला नाही. तसेच टाकळी ढोकेश्‍वर येथे डायमंड (गारगुटी) गैरव्यवहार प्रकरणात झालेल्या चौकशीचे लेखी प्रत तक्रारदारांना न मिळाल्याचीही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पारनेर, राहुरी, तिसगाव आणि अहिल्यानगर वन परिक्षेत्रातील चौकशी आदेश, व्हाउचर व कॅशबुक तपासणीसंदर्भातील माहिती तातडीने द्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


30 जूनच्या उपोषणानंतर सतत लेखी पत्रे दिल्यानंतरही विभागाने अद्याप कोणतेही लेखी उत्तर दिले नाही. याचा अर्थ मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे रघुनाथ आंबेडकर यांनी म्हंटले आहे. सर्व तक्रारींवर विषयवार लेखी उत्तर न मिळाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *