सुमन इंटरप्रायजेस अंतिम फेरीत; इलाइट फुटबॉल क्लब आणि बाटा एफसी टायब्रेकरवर होणार निर्णय
अंतिम फेरीच्या सामन्यासाठी उत्सुकतेला उधाण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे दिवंगत माजी सचिव गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या गॉडविन कप फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत खेळाचा थरार पहायला मिळाला. रोमांचक सामन्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवत वातावरण अक्षरशः रणधुमाळीने भरून गेले.
फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीच्या वतीने व जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अधिपत्याखाली तसेच डिक परिवाराच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उत्कृष्ट संघांमधील स्पर्धेमुळे सामने पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
पहिल्या उपांत्य सामन्यात सुमन इंटरप्रायजेस विरुद्ध नमोफ फुटबॉल क्लब यांच्यात रंगलेली लढत अटीतटीची ठरली. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला; परंतु सुमन इंटरप्रायजेसने प्रभावी खेळ करत 2-0 अशी मात केली. या सामन्यात शशांक वाल्मिक आणि यश कुटे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. नमोफ फुटबॉल क्लबला संपूर्ण सामन्यात एकही गोल करता आला नाही.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात इलाइट फुटबॉल क्लब आणि बाटा एफसी यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा ठरला. सामना शेवटच्या मिनिटापर्यंत गोलशून्य राहिल्याने निकाल लागला नाही. अखेर हा सामना टायब्रेकरवर निर्णयासाठी ढकलण्यात आला असून, दुसऱ्या दिवशी त्याचा निकाल लागणार आहे. या सामन्यातील विजयी संघ सुमन इंटरप्रायजेसच्या विरोधात अंतिम फेरीत भिडणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
