• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

एस.टी. विभागीय कार्यालयात कास्ट्राईबच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ByMirror

Apr 16, 2025
बाबासाहेबांना अभिवादन करुन भिमवंदना

बाबासाहेबांना अभिवादन करुन भिमवंदना

नगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी बौद्धाचार्य लक्ष्मण महागडे यांनी त्रिशरण आणि पंचशील प्रार्थना सादर केली तसेच यावेळी भिमवंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी चंदू चौधरी, पीपल्स हेल्पलाईनचे संस्थापक प्रकाश थोरात, सुरक्षा व दक्षता अधिकारी धर्मराज पाटील, कामगार अधिकारी बाळासाहेब एकशिंगे, उपयंत्र अभियंता महेश कासार, कास्ट्राईब संघटनेचे विभागीय सचिव शशिकांत वाघचौरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


शशिकांत वाघचौरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे आज आपण सर्वजण समानतेने जगत आहोत. सार्वजनिक सेवेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने बाबासाहेबांच्या विचारांचा अंगीकार करणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण समाजात समता, बंधुता आणि न्याय या तत्वांची रुजवणूक केली पाहिजे, असे ते म्हणाले.


प्रकाश थोरात यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या मंत्रामुळेच आपण आजच्या युगात उभे आहोत. त्यांनी दिलेले सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अधिकार आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेणारे आहेत. अशा या महामानवाची जयंती साजरी करणे हे फक्त औपचारिकता नसून त्यांच्या विचारांनुसार चालण्याची प्रतिज्ञा घेण्याचा दिवस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कास्ट्राईब संघटनेचे संजय शेलार, रमेश दळवी, अंबादास बनसोडे, विवेक झिर्पे, कुंदन परदेशी, अतुल हजारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *