सुरेश कराटी अकॅडमीच्या खेळाडूंची पदकांची लयलूट; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
नेप्तीत यशस्वी खेळाडूंचा गौरव; सातारा येथे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युनिफाईट असोसिएशन, अहिल्यानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 14 व्या युनिफाईट जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत नेप्ती (ता. नगर) येथील सुरेश कराटी अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण पदकांची कमाई केली. उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर या खेळाडूंनी जिल्हास्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या या यशामुळे नेप्ती गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
जनता विद्यालय, काष्टी येथे नुकत्याच पार पडलेल्या या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत जिल्हाभरातील विविध कराटे व युनिफाईट प्रशिक्षण केंद्रांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धांमध्ये नेप्ती येथील सुरेश कराटी अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत आयुष जाधव, शौर्य त्र्यंबके, मोहित जाधव, प्रथमेश वैराळ आणि गौरी त्र्यंबके यांनी सुवर्णपदक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तर गौरव त्र्यंबके याने रौप्यपदक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशस्वी खेळाडूंचा नेप्ती गावात सामाजिक कार्यकर्ते तसेच अहिल्यानगर जिल्हा सिलंबम असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पै. नाना डोंगरे व नेप्ती विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक जालिंदर शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश कदम, योगेश त्र्यंबके, कुमार त्र्यंबके, संदीप खामकर, सतीश पाचारणे, ह.भ.प. जपकर महाराज, शिवलिंग त्र्यंबके, खेळाडूंचे पालक, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, ग्रामीण भागात प्रचंड क्रीडा प्रतिभा दडलेली आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि पालकांचे सहकार्य मिळाल्यास हीच मुले राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करू शकतात. आज नेप्तीच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे त्यांच्या मेहनतीचे, प्रशिक्षकांच्या अथक परिश्रमाचे आणि पालकांच्या विश्वासाचे फलित आहे. विजय हा केवळ पदकापुरता मर्यादित नसतो, तर तो शिस्त, संयम, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांची एकत्रित जोड असते. निरोगी व सुदृढ समाज घडविण्यासाठी युवकांनी मैदानी खेळाकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना प्रशिक्षक सुरेश जाधव आणि भारती पाचारणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सुवर्णपदक विजेते खेळाडू आता 22 व 23 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यात होणाऱ्या राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

