• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

महाशिवरात्री निमित्त श्री आनंदेश्‍वर महादेव मंदिरात शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात

ByMirror

Feb 16, 2026
मंत्रमुग्ध करणारी वरात, भस्माची उधळण; भाविकांची उसळलेली गर्दी

मंत्रमुग्ध करणारी वरात, भस्माची उधळण; भाविकांची उसळलेली गर्दी


‘शिवलीलामृत’ पारायण व ‘ॐ नमः शिवाय’ जपाने परिसर भक्तीमय

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्‍वभूमीवर स्टेशन रोड येथील स्वामी अपार्टमेंटसमोरील श्री आनंदेश्‍वर महादेव व दत्त मंदिर परिसरात भगवान शंकर आणि पार्वती देवीचा विवाह सोहळा अत्यंत भक्तीभाव आणि उत्साहात संपन्न झाला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, हर-हर महादेवच्या जयघोषात निघालेली शिव-पार्वतीची वरात आणि विवाह सोहळ्याला लाभलेली भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.


शिव-पार्वतीच्या विवाह सोहळ्यात लहान मुलांनी विविध पौराणिक वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदविला. कोणी नंदी, तर कोणी शिवगणांच्या वेशात दिसत होते. भस्माची उधळण करीत आणि “हर हर महादेव”च्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात वरात परिसरातून मार्गक्रमण करत मंदिरात दाखल झाली. या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आदिशक्ती सार्वजनिक मित्र मंडळ व महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार मागील काही दिवसांपासून ‘शिवलीलामृत’ पारायण सोहळा तसेच ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा अखंड जप सुरू होता. दररोज सकाळ-संध्याकाळ महिला मंदिरात एकत्र येऊन सामूहिक जप करत होत्या. पारायणामुळे मंदिर परिसर भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला होता.


रविवारी (दि. 15 फेब्रुवारी) पहाटे 6 वाजता भगवान शिवाची विधिवत अभिषेक पूजा करण्यात आली. पंचामृत, बिल्वपत्र, दुग्ध आणि गंगाजल अर्पण करून महादेवांची आराधना करण्यात आली. त्यानंतर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विवाह सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार, मंगळाष्टक आणि फुलांची उधळण करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्या, घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आनंद व्यक्त केला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *