विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विधीवत महापूजा; भाविकांची दर्शनासाठी गर्दी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसर ‘विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…’ या नामगजराने दुमदुमून गेला असून संपूर्ण गावात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने पूजा, आरती आणि अभिषेक करून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी सुख-समृद्धी, चांगले आरोग्य आणि समाजात शांतता व ऐक्य नांदावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
या धार्मिक कार्यक्रमास विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, पिंटू जाधव, सिताराम फलके, ज्ञानदेव कापसे, गोरख फलके, डॉ. संदीप जाधव, अरुण काळे, भाऊसाहेब कापसे, शिक्षिका जयमाला, छगन भगत यांच्यासह ग्रामस्थ, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत भक्तिभावाने आरतीत सहभाग नोंदविला.
आषाढी एकादशीचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक भाविकांनी उपवास, नामस्मरण, हरिपाठ आणि भजन-कीर्तनाद्वारे आपली भक्ती व्यक्त केली. मंदिर परिसर आकर्षक सजावटीने नटला होता. सकाळपासूनच दर्शनासाठी महिलांसह ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांनी गर्दी केली होती. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत गावात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी एकमेकांना शुभेच्छा देत विठ्ठल नामाचा गजर केला.

