• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

संसदेत राष्ट्रीय मराठी ओळख कायदा 2025 करण्याची मागणी

ByMirror

Sep 11, 2025
जातीय भिंती मोडून एकतेसाठी भाषिक संकल्पना

मराठा! भाषिक-सांस्कृतिक राष्ट्रीय ओळख असावी -ॲड. कारभारी गवळी

जातीय भिंती मोडून एकतेसाठी भाषिक संकल्पना

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा ही कोणत्याही एका जातीची संज्ञा नाही, तर मराठी भाषा बोलणाऱ्या आणि मराठीला आपल्या आईची भाषा मानणाऱ्या प्रत्येकाची ती ओळख आहे. त्यामुळे मराठा या संज्ञेला जातिवादी चौकटीत अडकविण्याऐवजी राष्ट्रीय पातळीवर भाषिक-सांस्कृतिक ओळख म्हणून मान्यता दिली पाहिजे, अशी भावना पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.


भारत विविधतेतून एकता दाखवणारा देश असून, जातिव्यवस्था व पोटजातींच्या स्पर्धेमुळे ही एकता वारंवार दुर्बल होत असल्याचे ते म्हणाले.


भाषा ही संस्कृतीचा पाया आहे. मराठा ही संज्ञा मूळतः मराठी भाषेशी निगडित आहे. जसे बंगाली म्हणजे बंगाली भाषा बोलणारा, तसेच मराठा म्हणजे मराठी भाषा बोलणारा आहे. अनेक दशकांत काहींनी मराठा ही ओळख विशिष्ट जातीपुरती मर्यादित केली. यामुळे समाजात फूट पडली. आता हे थांबवणे आवश्‍यक आहे. मराठी भाषिकांना एकाच छत्राखाली आणल्यास केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात मराठी समाजाची ताकद अधिक दृढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


या उद्देशासाठी संसदेत राष्ट्रीय मराठी ओळख 2025 हा कायदा करण्यात यावा, अशी मागणी गवळी यांनी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने केली आहे. या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींविषयी ते म्हणाले की, मराठा म्हणजे ज्याची मातृभाषा मराठी आहे किंवा जो आपली प्राथमिक भाषा म्हणून मराठी बोलतो. जात, पोटजात, वंश किंवा कुल यावर कोणताही भेद केला जाणार नाही. केंद्र वा राज्य सरकार कोणत्याही व्यक्तीस मराठा या नावाने जात प्रमाणपत्र देऊ शकणार नाही. आधीची प्रमाणपत्रे रद्द ठरतील. जर कोणी मराठा या शब्दाचा उपयोग जातीय आरक्षण वा विशेषाधिकारासाठी करण्याचा प्रयत्न केला, तर किमान 10 वर्षांची सक्तमजुरी व किमान 1 लाख रुपये दंडाची शिक्षा होईल. हा गुन्हा अबाध्य व नॉन-कॉम्पाउंडेबल असेल. मराठा ही संज्ञा फक्त भाषिक-सांस्कृतिक ओळख म्हणूनच मान्य केली जाईल, अशी तरतूद या कायद्यात करण्याचे म्हंटले आहे.


ॲड. गवळी म्हंटले आहे की, आज भारताच्या प्रगतीसाठी जातीय भिंती तोडणे अत्यावश्‍यक आहे. मराठा ही ओळख एखाद्या जातीपुरती मर्यादित न ठेवता मराठी भाषिक सर्व घटकांची राष्ट्रीय ओळख म्हणून स्वीकारली, तर खरी सामाजिक एकता प्रस्थापित होईल. मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचे हृदय आहे. त्या भाषेला जपणारा प्रत्येकजण मराठा आहे. ही संकल्पना रुजवून आपण केवळ जातीय बंधने मोडणार नाही, तर भारताला एकसंघ, सबल आणि प्रगतिशील बनविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *