भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि मानवतेचा व्यापक वेध घेणारे ‘भारत : द इटर्नल’ प्रकाशित
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृती, विचारपरंपरा, तत्त्वज्ञान आणि मानवतेच्या सार्वत्रिक दृष्टिकोनाचा व्यापक वेध घेणारे युवा साहित्यिक तथा उद्योजक स्वप्नील खामकर यांच्या ‘भारत : द इटर्नल’ या सहाव्या पुस्तकाचे प्रकाशन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
या पुस्तकाच्या माध्यमातून भारताकडे केवळ भौगोलिक राष्ट्र किंवा प्राचीन संस्कृती म्हणून न पाहता, हजारो वर्षांची वैचारिक, आध्यात्मिक आणि मानवी परंपरा असलेली चिरंतन सभ्यता म्हणून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतीय विचारांमधील मानवतावाद, सार्वत्रिकता, अहिंसा, वेदान्ताचा व्यापक दृष्टिकोन, जागतिक शांतता आणि मानवएकतेची संकल्पना यांचा पुस्तकात अभ्यासपूर्ण वेध घेण्यात आला आहे. भारताच्या ज्ञानपरंपरेने जगाला दिलेल्या विचारांचा आधुनिक जगाशी असलेला संबंध, भारतीय तत्त्वज्ञानातील मानवकेंद्री दृष्टिकोन तसेच भविष्यातील जागतिक समाजासाठी भारतीय विचारांचे महत्त्व यावरही पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
आनंदराज आंबेडकर म्हणाले की, अत्यंत कमी वयात एवढा प्रतिभावान युवा लेखक पाहावयास मिळाला, ज्याने भारतीय संस्कृती, विचारपरंपरा आणि तत्त्वज्ञान आपल्या लेखणीतून मांडले आहे. युवकांचे पुस्तक वाचन कमी झाल्याने समाजातील प्रश्न त्यांना अवगत होण्यास वेळ जातो. स्वप्नील खामकर यांनी फिलॉसॉफीवर उत्तमपणे लिखाण केले असून, त्यांचे हे लेखन आजच्या युवकांसह विचारवंतांनाही दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार काशिनाथ दाते आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही ‘भारत : द इटर्नल’ या पुस्तकाचे कौतुक करून स्वप्नील खामकर यांना पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या.
संजय खामकर म्हणाले की, स्वप्नील खामकर केव्हा लिहितो आणि कोणत्या विषयावर लिहितो, हे कळत नाही. फक्त पुस्तक प्रकाशन जवळ आल्याने याची माहिती मिळते. त्याच्या पुस्तकातून विचार पेरले जाणार असून, युवकांनी वाचनाकडे वळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वप्नीलला पुस्तक लिहिण्याची आवड असून, संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीशी उभे आहे. मुलांचे गुण ओळखून त्यांना वाव द्या. मुलांवर आपली स्वप्ने लादू नका, असा महत्त्वपूर्ण संदेशही संजय खामकर यांनी यावेळी दिला.
ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांनी आजची जेन झी पिढी वाचत नाही, अशी ओरड होत असली तरी काही जेन झी युवक उत्तमपणे साहित्याचे लिखाण करत आहेत. ते आव्हानात्मक पुस्तके लिहीत आहेत. त्यामुळे संपूर्ण जेन झीला एकाच मापाने मोजणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाशन सोहळ्यास चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, संदीपदादा घनदाट, युवा नेते अमन आंबेडकर, महिला बालकल्याणचे बालाजी सोनटक्के, नगरसेवक सुरेश बनसोडे, मधुकर घनदाट, मछिंद्र दळवी, प्रतिभा खामकर, आण्णासाहेब खैरे, गुणगौरव सोहळा समितीचे संतोष कानडे, सुरेश शेवाळे, अरुण गाडेकर, सुभाष सोनवणे, संजय कानडे, राजेंद्र धस, सुनील धस, रामदास सातपुते, पाराजी साळे, सुरेश शेवाळे, भारत चिंधे, मनिष कांबळे, आरती सोनग्रा, अरुणा गोयल, रुक्मिणी नन्नावरे आदी उपस्थित होते.

