• Wed. Nov 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

अध्यात्माला सामाजिक कार्याची जोड; रक्तदान शिबिरातून जपली सामाजिक बांधिलकी

ByMirror

Nov 25, 2026
अध्यात्माला सामाजिक कार्याची जोड; रक्तदान शिबिरातून जपली सामाजिक बांधिलकी

संत रामपालजी महाराज यांच्या ५१३ व्या दिव्य धर्म यज्ञ दिनानिमित्त ढवळपुरीत भव्य रक्तदान शिबिर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ढवळपुरी (ता. पारनेर) येथील सतलोक आश्रमात संत रामपालजी महाराज यांच्या ५१३ व्या दिव्य धर्म यज्ञ दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यात्मासोबत सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात भाविकांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.
न्यू अर्पण रक्तपेढी यांच्या सहकार्याने झालेल्या शिबिरात १५३ रक्तपिशव्या संकलित झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
न्यू अर्पण रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, दीपावलीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. हा तुटवडा भरून काढण्यासाठी अशा रक्तदान शिबिरांची मोठी मदत होते. न्यू अर्पण रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिराचा जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होईल.


दिल्ली येथून आलेले भाविक अलकेश यांनी सांगितले की, संत रामपालजी महाराज यांच्या दिव्य धर्म यज्ञ दिनानिमित्त देशातील विविध आश्रमांमध्ये एकाच वेळी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह संपूर्ण देशातून भाविक या कार्यक्रमासाठी येतात. वर्षातून सहा वेळा तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या काळात भाविकांसाठी निवास, भोजन आणि वाहतुकीची मोफत व्यवस्था केली जाते. अन्नपूर्णा मोहिमेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना अन्न, वस्त्र आणि निवारा उपलब्ध करून देण्यासह अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तसेच गरजू रुग्णांच्या मोफत उपचारांसाठी सहकार्य केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांचा सतलोक आश्रम धनाना धाम, हरियाणा येथे असल्याचेही त्यांनी सांगितले.


नाशिक येथून आलेले आश्रम सेवादार रमेशदास केकान यांनी सांगितले की, देशभरातील साधारणतः १५ ते १७ आश्रमांमध्ये एकाच वेळी ५१३ वा दिव्य धर्म यज्ञ दिवस साजरा केला जात आहे. या सर्व ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्त कृत्रिमरीत्या तयार करता येत नसल्याने रक्तदानाचे महत्त्व मोठे आहे. संकलित केलेले रक्त रक्तपेढ्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविले जाते. वर्षातून सहा वेळा होणाऱ्या धार्मिक समागमांमध्ये रक्तदान, देहदान, वैद्यकीय शिबिरे, ज्ञानचर्चा आणि भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमध्ये गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


भगवान दास यांनीही या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यात वर्षातून सहा वेळा असे कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. भाविक महिला-पुरुष उत्स्फूर्तपणे रक्तदानात सहभागी होतात. यावेळी ढवळपुरी येथे १५३ युनिट रक्त संकलित झाल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदानासोबत देहदानाचाही उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
रक्त संकलन करण्यासाठी न्यू अर्पण ब्लड बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतून भाविक सहभागी झाले होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *