शहरात जलतरण स्पर्धा उत्साहात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा युवा सेनेच्या वतीने शहरात जलतरण स्पर्धा उत्साहात पार पडली. स्व. धर्मवीर माजी आमदार अनिल भैया राठोड जलतरण तलाव येथे झालेल्या या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवती सहभागी झाले होते. शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत (पप्पू) भाले, उपजिल्हाप्रमुख महेश शेळके,युवासेना उपशहर प्रमुख मुन्ना भिंगारदिवे, तसेच युवासेना, यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक योगीराज गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या बाल स्पर्धकांनी आपल्या जलतरण कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या जलतरण स्पर्धेत धनश्री कोकणे हिने प्रथम क्रमांक पटकावला. अर्णव गुंड याने द्वितीय तर शौर्य जाधव याने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धेमध्ये 50 मुला मुलींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये बाकीच्या स्पर्धकांना देखील सुवर्ण, रौप्य व कास्य पदक देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक योगीराज गाडे, अंबादास शिंदे, डॉ. श्रीकांत चिमटे, प्रशांत पाटील, प्रथमेश महेंद्रकर, बाळासाहेब जरे, जलतरण कोच गणेश देशपांडे, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला फटाक्यांची आतषबाजी, फ्लेक्सबाजी आदी वायफट खर्चाला फाटा देऊन विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे मुलांमध्ये क्रीडाप्रेम, शारीरिक तंदुरुस्ती आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

