शिक्षणासोबत व्यवसायाचे धडे; विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आनंद मेळ्यात मिळाली दाद
स्वतः बनविले, स्वतः विकले! आनंद मेळ्यात विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला चालना; स्नेहालयाच्या विद्यार्थिनीच्या स्केचने वेधले सर्वांचे लक्ष
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे, कल्पकतेला वाव देणे आणि स्वावलंबनाची जाणीव निर्माण करणे या उद्देशाने न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखा व एच.एस.एस.सी. व्होकेशनल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आनंद मेळा व फनफेअर उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची विक्री करत आपल्या व्यावसायिक कौशल्यांचे दर्शन घडविले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी तब्बल 80 हजार रुपयांहून अधिकची उलाढाल केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महाविद्यालयाच्या प्रांगणात आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते आनंद मेळा व फनफेअरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. कल्पना दारकुंडे, पर्यवेक्षक प्रा. सुभाष गोरे, प्रा. राजेंद्र जाधव, प्रा. प्राजक्ता भंडारी, प्रा. रंजना डिके, प्रा. कल्याण मुरकुटे, प्रा. किरण वाघमोडे, प्रा. संजय जाजगे, प्रा. चंद्रकांत फसले, प्रा. नितीन पानसरे, प्रा बाबासाहेब आडसुळ, प्रा. प्रमिला तांबे, प्रा. दत्तात्रय आहेर, प्रा. अनिता चव्हाण, प्रा. गणेश भगत, प्रा. संजय अकोलकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंद मेळ्यात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून 25 ते 30 स्टॉल्स उभारले होते. या स्टॉल्सवर ज्यूस, केक, कुल्फी, विविध स्नॅक्स, भेळ, इडली, चहा, पाणीपुरी, समोसे, इडली-सांबार, पापडभाजी, वडापाव यांसह विविध गोडधोड पदार्थांची विक्री करण्यात आली. याशिवाय जीवनोपयोगी वस्तूंचे स्टॉल्सही आकर्षणाचे केंद्र ठरले.
विद्यार्थ्यांनी पदार्थांची केलेली आकर्षक मांडणी, ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत, वस्तूंचे दर ठरविणे, विक्रीचे नियोजन आणि व्यवहार हाताळण्यातील कौशल्य यामुळे या मेळ्याला चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ खाद्यपदार्थ तयार करणेच नव्हे, तर त्यांची विक्री करून आर्थिक व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली. ‘कमवा व शिका’ या संकल्पनेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व, पैशांचे नियोजन, ग्राहकांच्या गरजा आणि व्यवसायातील नियोजनाचे महत्त्व समजून घेता आले. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे आणि मेहनतीचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण आणि नवनवीन कल्पना असतात. या गुणांना योग्य दिशा देऊन प्रत्यक्ष कृतीत आणल्यास स्वावलंबनाचा मार्ग खुला होऊ शकतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता ओळखण्याची, निर्णय घेण्याची आणि उपलब्ध साधनांचा योग्य वापर करण्याची संधी मिळते. व्यवसाय करताना नियोजन, मेहनत, कल्पकता आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य महत्त्वाचे असते. आनंद मेळ्यासारख्या उपक्रमांतून या गुणांचा विकास होऊन विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास मिळतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या आनंद मेळ्यात स्नेहालयातील इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या रंजना जाधव या विद्यार्थिनीने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. स्वतःच्या शैक्षणिक खर्चासाठी तिने तयार केलेले आकर्षक स्केच विक्रीसाठी ठेवले होते. तिच्या कलागुणांसोबतच शिक्षणासाठी स्वतः प्रयत्न करण्याच्या जिद्दीचे उपस्थितांनी कौतुक केले.
प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तिच्या स्केचला प्रतिसाद देत ते खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला. या माध्यमातून रंजनाच्या शैक्षणिक खर्चासाठी हातभार लागला. तिच्या कलेला मिळालेली दाद आणि शिक्षणासाठी स्वबळावर प्रयत्न करण्याची तिची वृत्ती या आनंद मेळ्यातील एक प्रेरणादायी बाब ठरली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. कल्पना दारकुंडे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. गणेश भगत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर पर्यवेक्षक प्रा. सुभाष गोरे यांनी आभार मानले. आनंद मेळा व फनफेअर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंदांनी परिश्रम घेतले.

