• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

अण्णा हजारे म्हणजे संविधान आणि पसायदानाचा जिवंत संगम -ॲड. गवळी

ByMirror

Jun 26, 2026
26 जूनला हुतात्मा स्मारकात अण्णांना दिली जाणार मानवंदना

अण्णांच्या कर्मभूमीला ‘संविधान-पसायदान संगमभूमी’ घोषित करण्याचा जनलोक संकल्प


26 जूनला हुतात्मा स्मारकात अण्णांना दिली जाणार मानवंदना


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सार्वजनिक जीवन हे भारतीय संविधानातील पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख शासनमूल्ये तसेच संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पसायदानातील सर्वजनहिताय, सर्वभूतहिताय विचारांचा जिवंत संगम आहे. म्हणूनच पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने अण्णा हजारे यांच्या कर्मभूमीला ‘संविधान-पसायदान संगमभूमी’ म्हणून घोषित करण्याचा जनलोक संकल्प केला असल्याची माहिती पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


हा उपक्रम गुरुवार, दि. 26 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी अण्णा हजारे यांना विशेष मानवंदना दिली जाणार करण्यात असून, त्यांच्या कर्मभूमीला संविधान आणि पसायदानाच्या संयुक्त चेतनेचे प्रतीक म्हणून गौरविण्यात येणार आहे.


ॲड. गवळी म्हणाले की, भारतीय संविधानाने देशाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूलभूत दिशा दिल्या; तर संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पसायदानाने सर्व जीवांच्या कल्याणाची, सद्बुद्धीची आणि विश्‍वबंधुत्वाची अंतःप्रेरणा दिली. अण्णा हजारे यांच्या आयुष्यभराच्या लोकसेवेने या दोन्ही प्रवाहांना प्रत्यक्ष कर्मयोगाचे रूप दिले आहे.
माहिती अधिकार चळवळ, ग्रामविकास, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती, स्वच्छ व पारदर्शक प्रशासनाची मागणी, तसेच लोकशाहीतील नैतिकता यांसाठी अण्णांनी केलेले कार्य हे संविधानिक मूल्यांचे जनआंदोलनात झालेले रूपांतर आहे. त्याचबरोबर त्यांची निस्वार्थ लोकसेवा, साधेपणा आणि सर्वांच्या कल्याणाची भूमिका ही पसायदानातील कर्मभक्तीची जिवंत अभिव्यक्ती असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.


या पार्श्‍वभूमीवर अण्णा हजारे यांची कर्मभूमी ही केवळ एका व्यक्तीच्या कार्याची भूमी नसून, संविधानाच्या बाह्य न्यायव्यवस्थेचा आणि पसायदानाच्या अंतर्मन परिवर्तनाच्या तत्त्वज्ञानाचा संगम घडविणारी प्रेरणाभूमी आहे, अशी भूमिका आयोजकांनी व्यक्त केली. या जनलोक संकल्प कार्यक्रमास लोकशाहीप्रेमी नागरिक, कार्यकर्ते, वकील, विद्यार्थी, शेतकरी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि पसायदान-संविधान विचारांचे समर्थक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने करण्यात आले आहे. या जनलोक संकल्पासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *