मैदानावर वकिलांचा उत्साह ओसंडला!; महिला वकिलांचाही उत्स्फूर्त सहभाग
जीवनात मैदानी खेळ म्हणजे औषध – अंजू शेंडे (प्रधान जिल्हा न्यायाधीश )
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर बार असोसिएशनतर्फे आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव 2025 वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्यातील विधीज्ञ, सरकारी वकील आणि बार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या क्रीडा महोत्सवाला वकील बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तर महिला वकीलही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सरकारी वकील अनिल घोडके, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे पाटील, उपाध्यक्ष ॲड. वैभव आघाव, सचिव ॲड. संदीप बुरके, महिला सचिव ॲड. जया पाटोळे, खजिनदार ॲड. अनुराधा येवले, सहसचिव ॲड. मनिष केळगंद्रे, ज्येष्ठ विधीज्ञ सुमतीलाल बलदोटा, अशोक बार्शीकर, बाजीराव बोठे, अमितेश झिंजुर्डे, वृषाली तांदळे, सचिन देवा पाठक, सुरेश भोर, कृष्णा झावरे आदींसह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे म्हणाल्या की, जीवनात मैदानी खेळ हे औषधाप्रमाणे असतात. खेळामुळे दैनंदिन ताण-तणाव कमी होतो, सकारात्मक वृत्ती वाढते आणि कामाचा उत्साह टिकून राहतो. महिलाही सर्वच खेळांमध्ये आघाडीवर असून, या महोत्सवात महिला वकील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या याचा आनंद आहे. स्पर्धा जिंकणे हाच उद्देश नसतो; सहभाग, शिस्त आणि टीम स्पिरिट हीसुद्धा तितकीच महत्त्वाची मूल्ये आहेत. वकिली करताना खेळाडू वृत्ती महत्त्वाची ठरत असल्याचे सांगून, या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे म्हणाले की, बार असोसिएशनच्या परंपरेने आणि एकोप्याने हा क्रीडा महोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा होत असतो. वकिलांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा ठरत आहे. जिंकणेहरणे गौण; परंतु आरोग्यासाठी आणि ताणतणावमुक्त जीवनासाठी मैदानावर उतरावे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्रीडा महोत्सवात वाडियापार्कमध्ये धावण्याच्या विविध गटांत रोमांचक स्पर्धा व क्रिकेट सामन्यांत सर्वांचे लक्ष वेधणारे सामने पार पडले. बॅडमिंटन, व्हॉलीबॉल स्पर्धेत वकीलांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. कॅरम व बुध्दीबळमध्ये शांतता, एकाग्रता आणि रोमहर्षक क्षण अनुभवयास मिळाला. या सर्व खेळांत वकील बांधवांसह महिला वकीलांनीही उल्लेखनीय सहभाग नोंदवला.
क्रीडा महोत्सव यशस्वी रित्या पार पडण्यासाठी बार असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य ॲड. रामेश्वर कराळे, ॲड. अभिजित देशमुख, ॲड. निखिल ढोले, ॲड. दिपक आडोळे, ॲड. शिवाजी शिंदे, ॲड. विजय केदार, ॲड. ज्योती हिमने यांनी विशेष परिश्रम घेतले.
