• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरच्या लेकीची स्क्रॅप व्यवसायाची यशोगाथा

ByMirror

Mar 11, 2026
उद्योगातून महिलांना दाखविला स्वावलंबनाचा मार्ग

कोमल साबळे यांचा राज्यस्तरीय यशस्वी उद्योजिका म्हणून पुणे येथे गौरव; महिला दिनानिमित्त सन्मान

उद्योगातून महिलांना दाखविला स्वावलंबनाचा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उद्योगक्षेत्रात महिलांनी पुढे येत समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, याचे प्रेरणादायी उदाहरण अहिल्यानगर शहरातील कोमल नाना साबळे यांनी घालून दिले आहे. स्क्रॅपच्या व्यवसायात स्वतःची स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण करत त्यांनी अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जागतिक महिला दिनानिमित्त दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (डिक्की) यांच्या वतीने त्यांचा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ‘यशस्वी उद्योजिका’ म्हणून सन्मान करण्यात आला.


या सन्मान सोहळ्यात डिक्कीचे संस्थापक-अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंदजी कांबळे, सोशल फॉर सोशल एन्टरप्रिन्युअरशीप मुंबईच्या चेअरपर्सन डॉ. अर्चना सिंग, डिक्की महिला आघाडीच्या राष्ट्रीय प्रमुख सीमाताई कांबळे, डिक्की पश्‍चिम भारताचे अध्यक्ष संतोष कांबळे, भारत सरकारच्या एससी-एसटी हबचे राज्य समन्वयक रितेशजी रंगारी, डिक्की महिला आघाडी राज्य प्रमुख निवेदिता कांबळे, राज्य उपप्रमुख गीता पेडणेकर, नगर जिल्हा डिक्कीचे प्रमुख चंद्रकांत काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.


कोमल साबळे यांनी काही वर्षांपासून स्क्रॅप व्यवसायात सातत्याने मेहनत घेत स्वतःच्या फर्मची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योग उभारतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या व्यवसायातून सुमारे 15 कष्टकरी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा आधार मिळाला आहे.

विशेष म्हणजे कोविडच्या कठीण काळातही त्यांनी आपल्या कामगारांना साथ देत त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली. तसेच शासकीय आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा दिला. संकटकाळातही कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची भूमिका लक्षात घेऊन डिक्कीच्या वतीने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.


या गौरवाबद्दल दलित उद्योग क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून तसेच डिक्कीचे महाराष्ट्र प्रमुख अविनाश जगताप, पुणे विभाग प्रमुख ललित बनसोड, मार्गदर्शक गौतमजी भोसले यांनीही कोमल साबळे व त्यांचे पती, प्रसिद्ध स्क्रॅप व्यापारी नाना साबळे यांचे अभिनंदन केले. यावेळी नगर जिल्ह्यातील महिला उद्योजिका मंदाकिनी काळोखे, शीतल वडागळे, वैशाली खरे तसेच उद्योजक नाना साबळे, राम वडागळे, सागर खरे, विजय क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *