• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

प्रगतशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांच्या चारा प्रयोगशाळेला कृषी अधिकाऱ्यांची भेट

ByMirror

Oct 10, 2025
आधुनिक पद्धतीने देशी-विदेशी चारा लागवडीचा आदर्श प्रकल्प

आधुनिक पद्धतीने देशी-विदेशी चारा लागवडीचा आदर्श प्रकल्प


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फत्तेपूर पॅटर्न ठरणार प्रेरणादायी -सुधाकर बोराळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील प्रगतशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांच्या नाविन्यपूर्ण चारा प्रयोगशाळेला जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी उपसंचालक सागर गायकवाड, नेवासा तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, मंडळ कृषी अधिकारी शिंदे आणि कृषी सहाय्यक अमोल साळवे यांनी भेट दिली.


या भेटीदरम्यान अधिकारी मंडळींनी देशी व विदेशी पद्धतीने सुरु असलेल्या विविध चारा प्रयोगांचे सविस्तर अवलोकन करुन माहिती घेतली. सोमेश्‍वर लवांडे हे गेली आठ ते नऊ वर्षे चारा उत्पादनातील नवकल्पना व प्रयोगशीलतेवर कार्यरत असून, त्यांनी तयार केलेल्या बियाण्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना उच्च प्रतीचा चारा उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या चारा प्रकल्पात थायलंड 4 नेपिअर, सुपर नेपिअर, अमेरिकन 5 केनियन जम्बो आणि विविध देशी-विदेशी जातींचे मिश्रण करून उच्च उत्पादन देणाऱ्या जातींचा विकास केला आहे.


जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे म्हणाले की, सोमेश्‍वर लवांडे यांचे कार्य हे केवळ चारा उत्पादनापुरते मर्यादित नाही, तर ते ग्रामीण भागातील कृषी-उद्योग संस्कृतीला चालना देणारे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फत्तेपूर पॅटर्न प्रेरणादायी ठरणार आहे.त्यांनी देश-विदेशातील विविध जातींचा अभ्यास करून स्थानिक वातावरणास साजेशा जातींची लागवड केली आहे. अशा प्रयोगशीलतेमुळे शेतकऱ्यांना चांगला नफा आणि दुधाच्या उत्पादनात वाढ दिसून येते.कृषी विभागाकडून लवांडे यांच्या या प्रकल्पाचा आदर्श इतर शेतकऱ्यांसमोर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रगतशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे म्हणाले की, मी गेली नऊ वर्षे चारा उत्पादनावर सातत्याने प्रयोग करत आहे. सुरुवातीला काही अपयश आले, पण सातत्य आणि संशोधनामुळे आज माझ्या शेतात देशी-विदेशी प्रकारचे चारा उपलब्ध आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये बियाण्यांचा पुरवठा होतोय, यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून असलेल्या दूध उत्पादनात चांगली वाढ झाली असल्याचे ते म्हणाले.


या भेटीवेळी फत्तेपूर येथील शेतकरी निखिल मुटकुळे,अनंत धुमाळ, ऋषिकेश धुमाळ, अतुल लिमगिरे, वैभव बोरुडे, रोहित धुमाळ आदी शेतकरी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *