• Fri. Aug 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

शुक्रवारी तुकाराम मुंढेंच्या कर्तव्यनिष्ठेला ‘तिरंगा धारणालय सलाम’!

ByMirror

Aug 27, 2026
शुक्रवारी तुकाराम मुंढेंच्या कर्तव्यनिष्ठेला ‘तिरंगा धारणालय सलाम’!

‘पगारहमीअक्कलमारी नोकरशाही’विरोधात 28 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन;


भ्रष्टाचार, निष्क्रियता व जनउत्तरदायित्वशून्य व्यवस्थेविरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा एल्गार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागरिकांच्या करातून वेतन घेऊनही जनतेची कामे प्रलंबित ठेवणाऱ्या, कायद्याऐवजी मनमानीला प्राधान्य देणाऱ्या आणि निर्णयांची जबाबदारी टाळणाऱ्या प्रशासकीय प्रवृत्तीविरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात व्यवस्थेतील निष्क्रिय प्रवृत्तीवर भाष्य करण्यासाठी ‘पगारहमीअक्कलमारी नोकरशाही’ हा जनजागृतीपर शब्दप्रयोग जाहीर करण्यात आला आहे.


संघटनांच्या मते, ‘पगारहमी’ म्हणजे जनसेवेचा परिणाम काहीही असला तरी वेतन आणि पदसुरक्षा निश्‍चित असणे; तर ‘अक्कलमारी’ म्हणजे ज्ञान, कायदा आणि उपलब्ध विवेकाचा लोकहितासाठी वापर न करता फाईलशाही, टोलवाटोलवी आणि मनमानीला प्राधान्य देणे. या प्रवृत्तीमुळे सामान्य नागरिकांना वेळेत न्याय, पारदर्शक सेवा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.


भारतीय प्रशासनातील प्रत्येक अधिकारी भ्रष्ट किंवा अकार्यक्षम नाही. अनेक अधिकारी प्रामाणिकपणे आणि लोकहिताची जाणीव ठेवून काम करीत आहेत. मात्र, संपूर्ण व्यवस्थेचा एकत्रित परिणाम सामान्य जनतेला अपेक्षित असलेल्या प्रभावी, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाच्या दृष्टीने अपुरा ठरत असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे हे आंदोलन भ्रष्टाचार, अनागोंदी, निष्क्रियता आणि जनउत्तरदायित्वशून्य प्रशासकीय वृत्तीविरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


सध्याच्या परिस्थितीला दोन प्रमुख कारणे जबाबदार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींमध्ये दिसणारे केंद्राभिमुख भावनिक स्वार्थशासन आणि लोकहिताची प्रभावी जाणीव व नियंत्रण नसताना वापरली जाणारी प्रशासकीय सत्ता यामुळे व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. या दोन्हींवर संविधानिक नैतिकता, कायद्याचे राज्य आणि जागृत ‘रिकॉन्शिअो’ विवेकशासनाचे नियंत्रण आवश्‍यक असल्याचे संघटनांनी नमूद केले.


कर्तव्यनिष्ठा, शिस्त, निर्णयक्षमता आणि लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचा आदर्श आंदोलनातून जनतेसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा प्रतीकात्मक गौरव करून त्यांना ‘तिरंगा राष्ट्रीय धारणालय सलाम’ अर्पण केला जाणार आहे. ‘तिरंगा धारणालया’च्या संकल्पनेनुसार केशरी रंग लोकभक्तीचा, पांढरा ज्ञानभक्तीचा आणि हिरवा कर्मभक्तीचा, तर अशोकचक्र संविधानिक नैतिकता व रुल ऑफ लॉ चे प्रतीक मानले जाते. प्रशासनातील प्रत्येक पद हे अधिकाराचे सिंहासन नसून जनसेवेचे उत्तरदायी साधन असले पाहिजे, असा संदेश या आंदोलनातून देण्यात येणार आहे.


“नोकरशाहीला मिळणारी पगारहमी ही निष्क्रियतेची हमी होऊ नये. तुकाराम मुंढे यांच्यासारखी कर्तव्यनिष्ठा अपवाद न राहता भारतीय प्रशासनाचा सार्वत्रिक स्वभाव बनला पाहिजे. तिरंगा केवळ कार्यालयावर फडकवून चालणार नाही; तो अधिकाऱ्यांच्या धारणालयात आणि प्रत्यक्ष कार्यपद्धतीत उतरला पाहिजे,” असा संदेश आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली आहे. या आंदोलनासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, अशोक भोसले, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *