निमगाव वाघात रंगलेल्या काव्य संमेलनात आदर्श शिक्षक व साहित्यिकांचा सन्मान
शिक्षणाचा अंतिम ध्येय सुसंस्कारी नागरिक घडविणे होय -शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशनच्या वतीने सहावे राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात पार पडले. शिक्षक दिनानिमित्त रंगलेल्या काव्य संमेलनात ज्येष्ठ कवी व नवोदित कवींनी आपल्या काव्यातून जीवनामध्ये शिक्षकांचे महत्त्व विशद केले. या काव्य संमेलनात शिक्षण, साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
परिवार मंगल कार्यालयात झालेल्या काव्य संमेलनाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी काव्य संमेलनाचे अध्यक्ष गीताराम नरवडे, कार्याध्यक्षा अनिताताई काळे, संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, भागचंद जाधव, दिलावर शेख, भाऊसाहेब ठाणगे, डॉ. विजय जाधव, उपसरपंच प्रमोद जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे म्हणाले की, शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना घडवत नाही, तर तो समाज घडवत असतो. शिक्षणाचा अंतिम ध्येय सुसंस्कारी नागरिक घडविणे आहे. धनसंपत्ती कालांतराने संपून जाते, मात्र ज्ञान ही गोष्ट दिल्याने वाढत असते. शिक्षकांसह समाजाच्या जडणघडणीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील मोठा वाटा आहे. समाजाला दिशा देण्याचे काम ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके म्हणाल्या की, समाजात शिक्षकांचा सन्मान होणे आवश्यक आहे. शिक्षकांमुळे सक्षम भारत घडत आहे. शिक्षक हा समाजाची पायाभरणीचे काम करत असून, त्यांच्यामुळे समाजव्यवस्था चांगल्या दिशेने जात आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांचा होणारा सन्मान कौतुकास्पद असल्याचे, त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे म्हणाले की, खेळाडू, कलाकार, साहित्यिक व कवी यांना संस्थेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. तर सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्यांना पुरस्काररुपाने त्यांना स्फुर्ती दिली जात आहे. शिक्षक दिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांचे निस्वार्थ कार्य समाजापुढे येण्यासाठी त्यांना पुरस्काराने सन्मानित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत चाबुकस्वार यांच्या कवितेने कार्यक्रमास प्रारंभ झाले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शिक्षक, मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते व उत्कृष्ट साहित्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अमोल महाराज फड, देवीदास बुधवंत, निवृत्ती महाराज कानवडे, गोकुळ गायकवाड, सरला सातपुते, हेमलता गिते, सिमा गायकवाड, शिवदास कांबळे, सुभाष सोनवणे, आनंदा साळवे या कवींनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कविता सादर केल्या. तर बालकवी प्रमोदिनी पठाडे, समृध्दी सुर्वे, दुर्गा कवडे, प्रिती टेकाळे या बालकवींनी देखील उत्कृष्ट कवितांचे सादरीकरण केले. एकापेक्षा एक सरस सादरीकरण झालेल्या कवितांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. शिवशाहीर ओवी काळे यांनी महापुरुषांवर पोवाडे सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, अतुल फलके, जालिंदर बोरुडे, रामा पवार, प्रा. गणेश भगत, मयुर काळे, रघुनाथ डोंगरे, भाऊसाहेब जाधव, गोरख चौरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील शेळके यांनी केले. आभार उत्तम कांडेकर यांनी मानले.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशनच्या वतीने सन्मानित करण्यात आलेले पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे:-
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य- उत्तम कांडेकर, अनिता काळे, अनुरिता झगडे, कारभारी शिंदे, प्रमिला झावरे, संगिता घोडके, भरत कांडेकर, एकनाथ पालवे, सिमा गायकवाड, स्मिता गायकवाड, अविनाश साठे, साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदान- सरोज आल्हाट, आत्माराम शेवाळे, बाळासाहेब कोठुळे, ओवी काळे, शिवदास कांबळे, विजय मोरे, उत्कृष्ट पत्रकारिता- प्रियंका पाटील शेळके, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य- शिवाजी पठाडे.