शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग
खेळाडूंच्या विचारांना चालना देणारा हा भारतीय खेळ खेळ -शशांक साहू
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेण्यात आलेली एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शहरातील जुने कोर्टा समोरील सुयोग मंगल कार्यालयात झालेल्या या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल ऑफिसर शशांक साहू व डॉ. रवींद्र साताळकर यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव यशवंत बापट, सुबोध ठोंबरे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, संजय खडके, सुनील जोशी, अनुराधा बापट, रोहिणी आडकर, ओंकार बापट, अविनाश कांबळे आदींसह खेळाडू व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शशांक साहू म्हणाले की, बुद्धिबळ हे जीवनात प्रत्येक पाऊल पुढे टाकताना विचार करण्याची शिकवण देतो. बुद्धिबळ खेळणारा खेळाडू भविष्यातील वेध घेऊन यशस्वीपणे पुढची चाल देत असतो. बुद्धिबळ खेळाने विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. रवींद्र साताळकर म्हणाले की, जीवन देखील एक बुद्धिबळ पट असून, विचारपूर्वक पुढे जावे लागते. मागे फिरण्याची शक्यता कमी असल्याने विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. काही निर्णय चांगले तर काही निर्णय चूकतात. चुकलेल्या निर्णयावर चांगले काम करून परिस्थिती सुधारण्याची शिकवण या खेळातून मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात यशवंत बापट यांनी बुद्धिबळ खेळाला चालना देण्यासाठी व नवीन खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे स्पष्ट केले. 9 वर्षाखालील गट, 14 वर्षाखालील गट, 19 वर्षाखालील गट, मुलींचा गट व खुला गटात ही स्पर्धा पार पडली. यामध्ये दीडशे पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते.
बक्षीस वितरण समारंभ सारस्वत बँकेच्या जनरल मॅनेजर मयुरी कोल्पेक यांच्या हस्ते झाले. विजेत्या खेळाडूंना थ्रीडी करंडक व रोख बक्षिस देण्यात आले. मुख्य पंच म्हणून सागर गांधी यांच्यासह सहाय्यक पंच म्हणून देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, देवेंद्र वैद्य, शाम कांबळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारूनाथ ढोकळे यांनी केले. आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले.
एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
खुला गट- प्रथम-हरीश घाडगे (नगर), द्वितीय- सुदीप पाटील (छ. संभाजी नगर), तृतीय- प्रज्वल आव्हाड (पाथर्डी), 19 वर्षाखालील प्रथम- स्वराज काळे (नगर), द्वितीय- आदेश देखणे (पाथर्डी), तृतीय- श्रीराम इंगळे (नगर), 14 वर्षाखालील प्रथम- जीनम संकलेचा (नगर), द्वितीय- दर्श पोरवाल (नगर), तृतीय- आरव भळगट (पुणे), 9 वर्षा खालील प्रथम-भूमिका वागळे (गंगापूर), द्वितीय- अन्वीत गायकवाड (नगर), तृतीय- ऋषीकेश राठोड (नगर), महिला गटात प्रथम- वेदांती इंगळे (नगर), द्वितीय- क्राटू माने (श्रीगोंदा), तृतीय- आरोही साबळे (नगर), ज्येष्ठ नागरिक गटात प्रथम- लालगोविंद कोळपेक (नगर), नगर तालुकास्तरीय गटात प्रथम- ऋषीकेश गुडघे, द्वितीय- सचिन कांबळे, तृतीय- अद्वेय धायतडक.