कॉ. गोविंद पानसरेंच्या खुनी व सूत्रधारांना शिक्षा कधी होणार?
या प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी पानसरेंच्या स्मृतीदिनी केले जाणार आंदोलन
अहमदनगर (प्रतिनिधी)- कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आठ वर्षे उलटून देखील आरोपींना अद्यापि शिक्षा झाली नसल्याच्या निषेधार्थ पानसरे यांच्या स्मृतीदिनी सोमवारी (दि.20 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर डावे पक्ष व संघटनांच्या वतीने एल्गार-जबाब दो आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. अॅड. बन्सी सातपुते यांनी दिली.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यार्यांना त्वरित जेरबंद करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे गृह खाते, त्यांच्या तपासयंत्रणांना कार्यक्षमतेने कामाला लावून न्यायालयास योग्य ते पुरावे सादर करण्याची डावे पक्ष व संघटनांची मागणी आहे. या आंदोलनात सर्व पुरोगामी संघटना, डावे पक्ष व संघटनांच्या पदाधिकार्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूरोगामी विचाराचे कृतिशील विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ दि.16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळीबार करण्यात आला. ते व त्यांच्या पत्नी कॉ. उमाताई पानसरे गंभीर जखमी झाल्या. यातून कॉ. उमाताई बचावल्या; परंतु 20 फेब्रुवारी 2015 रोजी उपचारादम्यान कॉ. गोविंद पानसरे यांचे निधन झाले. या घटनेला आता आठ वर्षे होत आहेत; मात्र त्यांची हत्या करणार्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही.
आजपर्यंत तपास विशेष तपास पथकाकडे (एस.आय.टी.) होता आणि आता तो दहशवाद विरोधी पथकाकडे (ए.टी.एस.) सोपविण्यात आला आहे. आता एटीएसचे अधिकारी तपास हाती घेताच न्यायालयातच म्हणतात फरार आरोपींना शोधणे कठीण आहे. म्हणजे अशा टोलवा-टोलवी मध्ये आणखी किती वर्षे लागणार? हा प्रश्न डावे पक्ष व संघटनांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगितला, मंडल आयोगाच्या समर्थनार्थ प्रचार मोहिम केली, आरक्षणाच्या बाजुने कायम भूमिका घेतली, राजर्षि शाहु महाराजांचा वसा आणि वारसा कथन केला आणि एटीएसचे अधिकारी हेमंत करकरे यांच्या मारेकर्यांविषयी आपीएस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांनी लिहिलेले व्हू किल्ड करकरे या पुस्तकावर 100 व्याख्याने आयोजनाचा संकल्प केला. या सर्व प्रकारामुळे धर्मांध, सनातनी विकृत्तींच्या पित्त खवळले आणि त्यांनी कॉ. पानसरेंची हत्या केली. या पूर्वी महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकर, कर्नाटकात गौरी लंकेश, कलबुर्गी या पुरोगामी प्रबोधनकारांनाही असेच संपविण्यात आले असल्याचे म्हंटले आहे.
आपल्या देशात भारतीय संविधान अस्तित्वात आहे, संविधानाने निर्माण केलेली न्यायालये आहेत. मात्र, ही मा. न्यायालयेही कोणत्या दबावाखाली वेळकाढूपणा करत आहेत? ही बाब समजत नाही. एकीकडे बिल्किस बानोच्या बलात्कारी गुन्हेगारांना मुक्त करण्यात येते, त्यांचे सत्कार-सोहळे आयोजित केला जातात आणि दुसर्या बाजूला उपेक्षित समूहाची बाजू घेणार्या वयोवृद्ध विचारवंतांना संशयित म्हणून तुरुंगात वर्षानुवर्षे सडविण्यात येत आहे. पानसरे-दाभोळकर यांच्या मारेकर्यांनाही मोकाट फिरण्याची मुभा मिळते. लोकशाहीवादी-धर्मनिरपेक्ष जनता म्हणून याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
