• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

पंडित नेहरू हिंदी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Jan 15, 2023

सांस्कृतिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

मोबाईल संस्कृतीतून घडलेल्या पिढीचे भवितव्य अंधकारमय -विक्रांत मोरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईलने संवाद खुंटला गेला. तर संवाद खुंटल्याने नवीन पिढी पर्यंत ज्ञानाचा प्रचार-प्रसार देखील लुप्त होताना दिसत आहे. मुलांवर मोबाईलचे संस्कार घडत असून, मोबाईल संस्कृतीतून घडलेल्या पिढीचे भवितव्य अंधकारमय आहे. मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी आई-वडिल व शिक्षकांचे संस्कार गरजेचे असल्याचे प्रतिपादन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले.


राष्ट्रभाषा शिक्षा मंडलद्वारा संचलित पंडित नेहरू हिंदी विद्यालय तथा प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी मोरे बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव किशोर मुनोत, मुख्याध्यापक सुहास धिवर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका उज्वला आदिक आदींसह शालेय विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे मोरे म्हणाले की, राष्ट्रभाषेतून शिक्षण देणार्‍या या शाळेचे कार्य अभिमानास्पद आहे. देशातील कानाकोपर्‍यातून आलेल्या बहुभाषिक वर्गाला हिंदीतून शिक्षण मिळत असून, या शाळेत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन शाळेत घडत असल्याचे त्यांनी सांगितले. तर संघर्षातून यश प्राप्ती होत असल्याचा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी लेझीम पथकातील विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांनी रेखाटलेले चित्रकला, साकारलेल्या विविध हस्तकलेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विविध हस्तकलेतून आकर्षक वस्तू बनवून विद्यार्थींनी मेक इन इंडियाचा संदेश दिला.


मुख्याध्यापक सुहास धीवर यांनी अहवाल वाचन करून वार्षिक गुणवत्तेचा वाढता आलेख सादर केला. तर विविध कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल माहिती दिली. प्रास्ताविकात कमल भोसले यांनी बहुभाषिक असलेल्या विद्यार्थ्यांना हिंदीतून शिक्षण देऊन, पुस्तकी ज्ञानाबरोबर अनुशासन व संस्काराने विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


संस्थेचे सचिव किशोर मुनोत म्हणाले की, विद्यार्थ्यांची प्रगती ही फक्त शैक्षणिक नसून, त्यांचा सर्वांगीण विकास साधला गेला पाहिजे. यासाठी शाळेत कला, क्रीडांना देखील प्रोत्साहन दिले जात आहे. पालकांनी आपल्या मुलांचे कलागुण ओळखून त्या दिशेने त्याला प्रोत्साहन द्यावे. वाढती बेरोजगारीवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे देखील धडे देण्याची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. वाचनाने भाषेचे ज्ञान वाढून, विचार समृद्ध होत असून विद्यार्थ्यांना त्यांनी वाचनाचे आवाहन केले.


कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणार्‍या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध गीतांवर नृत्याचे बहारदार सादरीकरण करुन, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता जोशी यांनी केले. आभार बाबासाहेब बोडखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक, शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *