• Fri. Mar 6th, 2026

रोटरी प्रियदर्शिनीची मार्कंडेय शाळेस दोन स्वच्छतागृहाची भेट

ByMirror

Dec 15, 2022

विद्यार्थ्यांच्या आरोग्यापासून ते शिक्षणासाठी रोटरी प्रियदर्शिनी प्रयत्नशील -प्रतिभाताई धूत

अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास दोन स्वच्छतागृहाची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी व त्यांची सोय होण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला.


शाळेत बसविण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन रोटरी प्रियदर्शिनीच्या प्रतिभाताई धूत व छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिव संध्या पांडे, शशी झंवर, गीता गिल्डा, ज्योति गांधी, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, उपाध्यक्ष विलास पेद्राम, डॉ. रत्नाताई बल्लाळ, विश्‍वस्त राजुशेठ म्याना, माजी मुख्याध्यापक दिपक रामदिन, प्रभारी मुख्याध्यापक संदिप छिंदम, प्रा. बत्तिन पोट्यन्ना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्याल, शिक्षक प्रतिनिधी भानुदास बेरड आदींसह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिभाताई धूत म्हणाल्या की, लहान वयातच विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छतेचे धडे दिले जातात. यासाठी शालेयस्तरावर स्वच्छता असणे व मुलांना स्वच्छतागृह वापरण्याची सवय लागण्यासाठी चांगले स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. शाळेतील स्वच्छतागृहाचा प्रश्‍न निर्माण झाल्यास मुलांची मोठी गैरसोय होत असते. या दृष्टीकोनाने हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.

संध्या पांडे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यापासून ते शिक्षणासाठी रोटरी प्रियदर्शिनी कार्य करत आहे. गरजू शाळा व विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


बाळकृष्ण सिद्दम यांनी रोटरीने शाळेस दिलेल्या स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. विशेषत: मुलींसाठी स्वच्छतागृहाची अत्यंत गरज होती. विद्यार्थ्यांची गरज ओळखून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. रोटरीच्या वतीने शिक्षण क्षेत्रात सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दिपक रामदिन, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम व संचालक मंडळाच्या प्रयत्नाने रोटरी प्रियदर्शिनीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *