पर्यावरण संवर्धनासाठी डोंगरे संस्थेचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक -आनंदा झरेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणार्या स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला आदर्श शिक्षक आनंदा खंडू झरेकर यांनी केशर आब्याची रोपं भेट दिली. निमगाव वाघा (ता. नगर) येथे झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात झरेकर यांनी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्याकडे रोप सुपुर्द केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, नगर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे, सुलोचना झरेकर, प्राचार्य तथा कवियत्री गुंफा कोकाटे, प्रा. डॉ. शैलेंद्र भणगे, अनुराज झरेकर, उद्योजक दिलावर शेख, योगेश पिंपळे आदी उपस्थित होते.
आदर्श शिक्षक आनंदा झरेकर म्हणाले की, ग्रामीण भागात डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे पर्यावरण संवर्धनासाठी सुरु असलेले कार्य दिशादर्शक आहे. संस्थेच्या वतीने सातत्याने वृक्षरोपण व संवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनत असताना, सर्वांनी सामाजिक भावनेने योगदान दिल्यास बदल घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य तथा कवियत्री गुंफा कोकाटे यांनी डोंगरे संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
पै. नाना डोंगरे यांनी पर्यावरण संवर्धनासह संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून घेऊन, प्रत्येकाने या चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. तर गावात वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

