• Sat. Nov 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

महिलांचा सन्मान हीच दिवाळीची खरी भेट -आमदार संग्राम जगताप

ByMirror

Nov 14, 2026
महिलांचा सन्मान हीच दिवाळीची खरी भेट -आमदार संग्राम जगताप

साई श्रद्धा फाउंडेशनच्या वतीने महिलांना साड्यांची भेट; दिवाळीचा आनंद महिलांसोबत वाटला


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे माध्यम नसून समाजातील प्रत्येक घटकाला आनंदात सहभागी करून घेण्याचा उत्सव असतो. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांचा सन्मान करण्याचा साई श्रद्धा फाउंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजातील गरजू आणि सर्वसामान्य महिलांना सणाचा आनंद घेता यावा, यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


साई श्रद्धा फाउंडेशनच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी दिवाळीनिमित्त साडी वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार जगताप यांच्या हस्ते महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना चंद्रकांत परकाळे यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे आमदार संग्राम जगताप म्हणाले की, दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि आपुलकीचा सण आहे. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. महिलांचे कुटुंबाच्या जडणघडणीत आणि समाजाच्या विकासात मोठे योगदान असते. त्या आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. अशा महिलांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. साई श्रद्धा फाउंडेशनने महिलांना साडी भेट देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारा असल्याचे त्यांनी सांगितले.


फाउंडेशनच्या सचिव आर्किटेक्ट कु. श्रद्धा परकाळे यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. महिलांचे सक्षमीकरण, महिलांचा सन्मान आणि समाजातील विविध घटकांसाठी फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना चंद्रकांत परकाळे म्हणाल्या की, दिवाळीचा आनंद सर्वांसोबत वाटून घेतल्याने सणाचे महत्त्व अधिक वाढते. महिलांना दिवाळीनिमित्त साडी भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि त्यांना या आनंदोत्सवात सहभागी करून घेणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. महिलांना मिळालेली ही साडी म्हणजे केवळ वस्तुरूप भेट नसून त्यांच्या सन्मानाची आणि आपुलकीची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, विराज टाक यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते. महिलांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *