मुकुंदनगरमधील वाजिद शेख यांचा शोध सुरू;
अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा भावाचा संशय, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर परिसरातील मेहराज मस्जिदजवळ राहणारे वाजिद सत्तार शेख (वय 45) हे काचेचे पॅनल बसविण्याचे काम करण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास कामावर जात असल्याचे सांगून ते घरातून निघाले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचा मोबाईल फोनही बंद येत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांचे अपहरण केले असावे, असा संशय त्यांच्या भावाने व्यक्त केला असून, याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
वाजिद शेख यांचे लहान भाऊ फरीद सत्तार शेख यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, वाजिद हे आपल्या कुटुंबासह मुकुंदनगर परिसरात राहतात. ते काचेचे पॅनल बसविण्याचे काम करतात. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास कामावर जात असल्याचे सांगून ते घरातून बाहेर पडले. सायंकाळी सातच्या सुमारास फरीद घरी आले असता, आई बीबीसायरा यांनी वाजिद सकाळपासून कामावर गेले असून अद्याप घरी परतले नसल्याचे सांगितले. तसेच त्यांचा मोबाईल फोनही बंद येत असल्याची माहिती दिली.
यानंतर फरीद यांनी वाजिद काम करीत असलेल्या अहिल्यानगर शहरातील ठिकाणी जाऊन चौकशी केली. मात्र, ते त्या दिवशी कामावर आलेच नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. त्यानंतर मुकुंदनगर परिसरासह नातेवाईकांकडेही त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही वाजिद यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
अखेर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आपल्या भावाचे अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करीत फरीद शेख यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. बेपत्ता वाजिद शेख याची माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन किंवा 9028633036 (फरीद) या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

