• Fri. Oct 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

आप्पासाहेब शिंदे पॅनल’चा दणदणीत विजय; जगन्नाथ शिंदे यांची अध्यक्षपदी सलग दहाव्यांदा निवड!

ByMirror

Oct 30, 2026
शिर्डीत पार पडलेल्या MSCDA निवडणुकीत शिंदे पॅनलचे यश; प्रमुख पदांवर अनुभवी

 महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत शिंदे पॅनलला प्रचंड बहुमत; अध्यक्षपदाची सलग दहावी धुरा!


 शिर्डीत पार पडलेल्या MSCDA निवडणुकीत शिंदे पॅनलचे यश; प्रमुख पदांवर अनुभवी पदाधिकाऱ्यांची निवड


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या (MSCDA) सन 2026-2029 या कालावधीसाठी शिर्डी येथे नुकतेच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘आप्पासाहेब शिंदे पॅनल’ने प्रचंड बहुमत मिळवत दणदणीत विजय संपादन केला. या निवडणुकीत आप्पासाहेब उर्फ जगन्नाथ शिंदे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी सलग दहाव्यांदा निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने प्रमुख पदांवर विजय मिळवत संघटनेवरील आपला प्रभाव पुन्हा अधोरेखित केला. राज्यातील एक लाखांहून अधिक सदस्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेच्या निवडणुकीत औषध विक्रेत्यांनी अनुभव, विश्‍वासार्हता आणि संघटनात्मक एकजुटीला पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.


या निवडणुकीत औषध विक्रेत्यांच्या व्यवसायाशी संबंधित प्रश्‍न, दैनंदिन अडचणी, प्रशासनाशी समन्वय आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने शिंदे पॅनलला मोठा पाठिंबा मिळाला. नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी रामदास भोसले आणि सुनील भंगाळे यांची निवड झाली आहे. संघटनेच्या महत्त्वाच्या सचिवपदी अनिल नावंदर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला, तर कोषाध्यक्षपदी वैजनाथ जागुष्टे यांची निवड झाली आहे.


महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी म्हणून अजित पारख यांची निवड करण्यात आली असून, सोलापूर येथील बसवराज मनुरे यांची कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहसचिवपदी सुनील छाजेड आणि संघटन सचिवपदी पंकज नानवाणी यांनी विजय मिळवला आहे. या निवडींमुळे संघटनेच्या आगामी कामकाजासाठी अनुभवी पदाधिकाऱ्यांची टीम तयार झाली आहे.


राज्यातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट बांधवांच्या दैनंदिन अडचणी, व्यवसायासमोरील बदलती आव्हाने, प्रशासनाशी संबंधित प्रश्‍न आणि औषध विक्रेत्यांच्या हिताचे संरक्षण या मुद्द्यांना आगामी काळात प्राधान्य देण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. औषध विक्रेत्यांच्या रास्त मागण्या मार्गी लावण्यासाठी तसेच व्यवसायाला सुरक्षितता आणि नवी दिशा देण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील, असा विश्‍वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


जगन्नाथ शिंदे यांच्या कार्याची देशपातळीवरही दखल घेतली जात असून, त्यांच्यावर देशपातळीवरील अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील औषध विक्रेत्यांच्या संघटनात्मक प्रश्‍नांना प्रभावीपणे मांडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या निवडणुकीतील विजयानंतर राज्यभरातील जिल्हा व तालुकास्तरीय औषध विक्रेता संघटनांचे पदाधिकारी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून नवनिर्वाचित अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात येत आहे.


महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची दोन दिवसीय कार्यकारिणी सभा, निवडणूक प्रक्रिया तसेच शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाचे नियोजन अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यात आले. या आयोजनासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी, संचालक आणि समिती सदस्यांनी समन्वयाने काम केले. या यशस्वी आयोजनासाठी MSCDA चे जनसंपर्क अधिकारी अजितभाऊ पारख आणि अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ गाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये सचिव आबासाहेब बेद्रे, खजिनदार प्रशांत उबाळे, शशांक रासकर, चेतन कर्डिले,  सूर्यकांत भुजाडी, गणेश वाणी, सचिन शिंदे, अतुल चांगले, रवींद्र गुलाटी, अमित धाडगे, रुपेश भंडारी, आशुतोष कुकडे, साहेबराव आहेर, अवधूत बोरुडे, शैलेंद्र औटी, तात्याराम बांदल, सुहास जरांगे, सूरज लांडे,  ज्ञानेश्वर दरंदले, युवराज खेडकर, बाळासाहेब ढेरंगे, विजय जगताप, संदेश जाजू, सचिन अमृतकर, मनोज खेडकर, भरत सुपेकर, महेश आठरे, कमलेश गुंदेचा, नितीन सातपुते, अभिजीत गांगर्डे आणि मनीष सोमाणी यांचा समावेश होता. या सर्वांनी आयोजन यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


–
“हा विजय माझ्या एकट्याचा नसून राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांच्या एकजुटीचा आणि माझ्यावरील विश्‍वासाचा विजय आहे. केमिस्ट बांधवांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू.” राज्यातील औषध विक्रेत्यांनी दाखवलेल्या विश्‍वासाला पात्र ठरणे, त्यांच्या व्यवसायासमोरील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आणि संघटनेची एकजूट अधिक बळकट करणे, हे आगामी कार्यकाळातील महत्त्वाचे उद्दिष्ट राहणार आहे. -आप्पासाहेब उर्फ जगन्नाथजी शिंदे

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *