• Sat. Oct 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगारमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात

ByMirror

Oct 31, 2026
झाडे लावा, पाणी वाचवा, पर्यावरण जपा’चा जागर

वृक्षारोपण व स्वच्छता अभियानातून पर्यावरण रक्षणाचा संदेश!


‘झाडे लावा, पाणी वाचवा, पर्यावरण जपा’चा जागर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशाचे पहिले उपपंतप्रधान व भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भिंगार येथे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि एकता रॅलीतील सहभागातून ग्रुपच्या सदस्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वाढते तापमान, पाणीटंचाई आणि दुष्काळाचे संकट लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करावे, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या राष्ट्रएकात्मतेच्या कार्याचे स्मरण करून उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला. यानंतर उद्योजक लॉरेन्स स्वामी व भिंगार छावणी परिषदेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक गणेश भोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


तसेच परिसरात स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी एकता रॅलीत सहभागी होत राष्ट्रीय एकात्मता, झाडे लावा, पर्यावरण वाचवा आणि पाणी बचतीचा संदेश दिला. या उपक्रमासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, जहीर सय्यद, ताराचंद टोकळ, सर्वेश सपकाळ, अशोक पराते, दिलीप ठोकळ, योगेश चौधरी, सुंदरराव पाटील, सखाराम अळकुटे, निजाम पठाण, अभिजीत सपकाळ, विकास भिंगारदिवे, संतोष लुनिया, छावणी परिषदेचे मनोनित सदस्य वसंत राठोड, कार्यालयीन अधीक्षक सुनील शिंदे, मुख्याध्यापक संजय शिंदे, राजेंद्र भोसले, भारुड सर, दिलीपराव पालवे, रतन मेहेत्रे, जोगिंदरसिंग, उमाशंकरसिंग पंडित, सरदारसिंग परदेशी, अविनाश पोतदार, शेषराव पालवे, सुभाष पेंढुरकर, दीपक घोडके, रामनाथ गर्जे, देविदास गंडाळ, कांता वाघुळे, वामन पगारे, महादेव साबळे, बाळासाहेब सूर्यवंशी, विशाल भामरे, बाळासाहेब झिंजे आदी उपस्थित होते.


हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील विविध संस्थानांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचा भक्कम पाया घातला. त्यांच्या कार्यातून एकजूट, शिस्त आणि देशहितासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते. त्याच विचारातून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. आज पर्यावरणाचा समतोल बिघडत असून पाणीटंचाई आणि दुष्काळाचे संकट गंभीर होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे स्पष्ट केले.


सचिन चोपडा म्हणाले की, पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून त्याचा अपव्यय थांबविणे ही काळाची गरज आहे. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे, वृक्षलागवड करणे आणि लावलेल्या झाडांचे संगोपन करणे या गोष्टी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविल्या पाहिजेत. दुष्काळमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर शासनाच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले.


उद्योजक लॉरेन्स स्वामी यांनी आजच्या काळात विकासाबरोबरच निसर्गाचे संवर्धन करणे अत्यंत आवश्‍यक आहे. वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची संख्या कमी होत असून त्याचा परिणाम पर्यावरणावर आणि पर्जन्यमानावर होत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाचा संकल्प करून लावलेल्या झाडांची जबाबदारी स्वीकारण्याचे सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *