दुष्काळ हटावा यासाठी देवी चरणी पाऊसासाठी साकडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त बोल्हेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उपवासाचे फराळ भाविकांना वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाला नगरसेविका आशाबाई लोभाशेठ कातोरे, नगरसेवक नवनाथ कातोरे, जालिंदर कातोरे, येवशेब मकासरे, अजय वाघमारे, संतोष आल्हाट, मंगेश कोल्हे, आचारी दादू पगारे, सचिन लोखंडे, कांतीलाल साबळे, सोमनाथ आव्हाड, सनी साळवे, पप्पू चव्हाण, डिप्पू तिवारी, विशाल चव्हाण, रमेश नेटके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून बोल्हेगाव परिसरात विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, महाशिवरात्री, नवरात्रोत्सव तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुढाकारातून अन्नदान आणि इतर समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त भाविकांना फराळचे वाटप करण्यात आले. यावेळी फराळ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. राज्यात दुष्काळाचे सावट असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रावरील संकट लवकर दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा आणि शेतकरी सुखी-समाधानी व्हावा, अशी प्रार्थना देवीचरणी उपस्थितांनी केली.

