• Sun. Oct 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील श्री मार्कंडेय पतसंस्थेत गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, जिद्द आणि उद्योजकतेचे मार्गदर्शन

ByMirror

Oct 18, 2026
बाबासाहेब बोडके, सुरेशराव चव्हाण यांचा विशेष गौरव

बाबासाहेब बोडके, सुरेशराव चव्हाण यांचा विशेष गौरव


‘चांगला माणूस बना, जिद्द आणि चिकाटीने यश मिळवा’-बाबासाहेब बोडखे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आणि श्री मार्कंडेय अभ्यासिका व ग्रंथालयाच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित या सोहळ्यात अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्याबद्दल मुख्याध्यापक बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, शून्यातून विश्‍व निर्माण करणारे व्यावसायिक सुरेशराव चव्हाण यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमातून शैक्षणिक प्रगती, उद्योजकता, सामाजिक बांधिलकी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यात आला.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बापूसाहेब उत्तेकर आणि स्थानिक नगरसेवक निखिल वारे उपस्थित होते. सत्कार समारंभाच्या निमित्ताने मान्यवरांनी आपापल्या जीवनातील अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी प्रेरित केले.
सत्काराला उत्तर देताना बाबासाहेब बोडके यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, जिद्द, चिकाटी आणि जीवनातील ध्येयपूर्ती याविषयी मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी अभ्यासातील सातत्य, योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्‍वास आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. जीवनात केवळ मोठे पद मिळवणे महत्त्वाचे नसून, एक चांगला माणूस म्हणून समाजात वावरणे आणि सामाजिक बांधिलकी जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.


विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय निश्‍चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. अपयश आले तरी निराश न होता त्यातून शिकून पुढे जाण्याची वृत्ती जोपासावी, असा संदेश त्यांनी दिला. श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित न राहता अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि प्रेरणादायी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. संस्थेचे हे कार्य संपूर्ण समाजासाठी दिशादर्शक आणि कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही बोडखे यांनी काढले.
जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित सुरेशराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून तरुणांना उद्योजकतेचे महत्त्व पटवून दिले. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मेहनत, सातत्य, प्रामाणिकपणा, ग्राहकांशी विश्‍वासाचे नाते आणि बदलत्या काळानुसार आवश्‍यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शून्यातून स्वतःचे विश्‍व निर्माण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, संकटांना न घाबरता आत्मविश्‍वासाने वाटचाल केल्यास यशाचा मार्ग निश्‍चितपणे सापडतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तरुणांनी नोकरीच्या संधी शोधण्याबरोबरच स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दिशेनेही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.


समाजातील तळागाळातील घटकांना आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी श्री मार्कंडेय पतसंस्था करीत असलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य नागरिकांना आधार मिळत असून, अशा उपक्रमांचे अनुकरण इतर संस्थांनीही करावे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
नगरसेवक निखिल वारे यांनी आपल्या मनोगतात पद्मशाली समाजाच्या कष्टकरी आणि प्रामाणिक परंपरेचा गौरव केला. अहिल्यानगर शहरात पद्मशाली समाजाने अनेक वर्षांपासून आपल्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेली श्री मार्कंडेय पतसंस्था शहरासाठी अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. विशेषतः तळागाळातील नागरिक आणि गोरगरीब विडी कामगारांसाठी श्री मार्कंडेय पतसंस्था कल्पवृक्षाप्रमाणे आधार देणारी ठरत आहे. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करणे, तसेच शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे, हे संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बापूसाहेब उत्तेकर यांनी संस्थेच्या आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक उन्नतीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. संस्थेच्या संचालक मंडळाने आर्थिक व्यवहारांपुरते कार्य मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून ज्ञानार्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हा उपक्रम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्तेकर यांनी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना आपल्या जीवनप्रवासातील संघर्षाचे अनुभव सांगितले.


या सत्कार समारंभाला पतसंस्थेचे चेअरमन नारायण विश्‍वनाथ कोडम, व्हाईस चेअरमन सविता प्रकाश कोटा, बालराज राज्जय्या सामल यांच्यासह संचालक इराबत्तीन उमेश चंद्रय्या, अंदे दत्तात्रय विठ्ठल, चिप्पा संजय कृष्णाहारी, शेराल अशोक भुमय्या, गणेश सदाशिव वेदपाठक, गौतम नाथू भिंगारदिवे, मच्चा विनायक विश्‍वनाथ, गुडा देविदास अशोक, कारमपुरी रघुनाथ सिद्राम आणि वड्डेपेली रेखा गणेश उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक आशिष बोगा आणि कर्मचारीवृंद यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे ज्येष्ठ सदस्य बालराज सामल यांनी केले, तर व्हाईस चेअरमन सविता कोटा यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, सभासद आणि नागरिकांचे आभार मानले. या सोहळ्याला अभ्यासिकेतील विद्यार्थी, संस्थेचे सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *