मोरया युवा प्रतिष्ठानचा ‘माता की चौकी’ सोहळा भक्तिमय वातावरणात
हनुमानजींच्या प्रतिकृतीने वेधले भाविकांचे लक्ष
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवानिमित्त सावेडी येथील गुलमोहर रोडवरील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘माता की चौकी’ हा धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. देवीच्या सुमधुर भक्तिगीतांनी मंत्रमुग्ध झालेल्या भाविकांनी ‘जय माता दी’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविणाऱ्या भक्तिगीतांसह धार्मिक गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात भक्तीचा रंग भरला. ‘जय श्रीराम’ या गीताच्या सादरीकरणावेळी अवतरलेल्या हनुमानजींच्या प्रतिकृतीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
जय वैष्णो माता जागरण मंडळाच्या वतीने बल्लू सचदेव यांनी देवीची विविध भक्तिगीते सादर केली. देवीच्या महिम्याचे वर्णन करणाऱ्या आणि तिच्या विविध रूपांचे दर्शन घडविणाऱ्या गीतांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. वाद्यांच्या सुरेल साथीने सादर झालेल्या भक्तिगीतांवर भाविक तल्लीन झाले होते. प्रत्येक गीताला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. ‘जय माता दी’च्या गजराने मंदिर परिसरातील वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमात भाविकांनी देवीच्या भक्तिगीतांचा मनमुराद आनंद लुटला. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक सहभागातून साकारलेल्या या सोहळ्यामुळे नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिकच वाढला. परिसरातील नागरिक, महिला आणि विविध समाजांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचा जागर केला.
‘माता की चौकी’ कार्यक्रमाला पार्वती (काकी) जगताप, सुवर्णा सचिन जगताप आणि महापौर ज्योतीताई गाडे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी मोरया युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मदान यांच्यासह परिसरातील नागरिक, शीख व पंजाबी समाजबांधव, राजकीय पदाधिकारी, नगरसेवक, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि महिलांची मोठी उपस्थिती होती. रंगलेल्या भक्तीगीतांवर उपस्थित पाहुण्यांनी भाविकांसह ठेका धरला होता. देवीच्या आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचे स्वागत सौ. अभिलाषा मदान आणि कु. अर्चना मदान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विधिवत घटस्थापना करून देवीची आकर्षक मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मदान म्हणाले, की देवी हे शक्ती आणि भक्तीचे स्वरूप आहे. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून समाजात श्रद्धा, सकारात्मकता आणि एकतेची भावना वृद्धिंगत व्हावी, हा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे. धार्मिक सण-उत्सवांचे आयोजन करण्याबरोबरच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहण्याचे कार्य प्रतिष्ठान सातत्याने करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी मनोज मदान यांनी उपस्थितांचे आभार मानले.

