राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने गौरव; 2230 इंच आकाराच्या कागदावर पेनाच्या साह्याने रेखाटलेली कलाकृती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कला क्षेत्राच्या विकासासाठी हैदराबाद येथील ‘माजदा आर्ट फाउंडेशन’तर्फे दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर कला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत 5 लाख रुपयांची पारितोषिके देऊन भारतातील नवोदित तसेच प्रस्थापित कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. यावर्षी 11 ते 13 सप्टेंबर 2026 दरम्यान ‘स्टेट गॅलरी ऑफ आर्ट’, माधापूर, हैदराबाद येथे हे भव्य प्रदर्शन पार पडले. या राष्ट्रीय स्पर्धेत रोशन साहू यांना प्रथम तर अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथील चित्रकार तथा प्राध्यापक नुरील भोसले यांच्या ‘आफ्टर ग्रेझिंग’ (After Grazing) या चित्रास द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
या स्पर्धा-प्रदर्शनात देशभरातील सुमारे 200 कलाकारांच्या 250 हून अधिक उत्कृष्ट कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. पुरस्कार वितरण सोहळा ‘पोल्मॉन ग्रुप’च्या संचालिका तथा ख्यातनाम कला मर्मज्ञ उशाराणी मन्ने यांच्या हस्ते संपन्न झाला. या स्पर्धेसाठी अजिंत्या हजरा, माधवन गोयल, सदाशिव सावंत, निशिकांत पाळंदे आणि बोल्गुम नागेश गौड या भारतातील ख्यातनाम कलाकारांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नुरील भोसले यांचे ‘आफ्टर ग्रेझिंग’ (चरून झाल्यानंतर) हे चित्र कृष्णधवल (Monochrome) स्वरूपात ‘स्टीपलिंग’ (Stippling – बिंदू तंत्र) या अत्यंत कल्पक तंत्रात रेखाटलेले वास्तववादी चित्र आहे. 2230 इंच आकाराच्या कागदावर पेनाच्या साह्याने रेखाटलेली ही कलाकृती आहे.
चित्रात एक गाय झाडाखाली जमिनीवर शांतपणे बसून रवंथ करताना व विश्रांती घेताना दिसते. चित्राच्या खालील बाजूस गाईचे सूक्ष्म व तपशीलवार रेखाटन केले असून, वरच्या कोपऱ्यात बाभळीच्या झाडाची छोटी फांदी व पाने दाखवून चित्राची रचना सुरेख संतुलित केली आहे. पार्श्वभूमीत सोडलेली मोकळी जागा प्रखर उन्हाची तीव्रता दर्शवते आणि मुख्य विषयाकडे लक्ष वेधून घेते. गाईच्या शरीरावर पडणारा सूर्यप्रकाश, कातडीवरील सुरकुत्या, अंगावरील केस, स्नायूंची रचना, हाडांची बाह्यरेषा आणि सुकलेले गवत दर्शवण्यासाठी पेनाच्या असंख्य बिंदूंचा (Stepling) अत्यंत कौशल्याने वापर करण्यात आला आहे.
एका साध्या ग्रामीण प्रसंगाला या चित्रात अत्यंत गंभीर, कलात्मक आणि भावूक रूप प्राप्त झाले आहे. दिवसभर चरल्यानंतर प्राण्याच्या मनात निर्माण होणारी तृप्ती, शांतता आणि निवांतपणा या चित्रातून व्यक्त होतो. अर्धवट सावलीत बसलेली गाय आणि छाया-प्रकाशाचा हा प्रयोग प्रेक्षकाला एक ध्यानस्थ, निवांत आणि समाधानी अनुभव देतो.

