• Sun. Oct 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये दांडियाचा जल्लोष; विद्यार्थिनींसह शिक्षिकाही थिरकल्या!

ByMirror

Oct 18, 2026
दिवसभर अर्थार्जन, रात्री ज्ञानार्जन; रात्रशाळेतील 277 महिला व मुलींचा सहभाग

दिवसभर अर्थार्जन, रात्री ज्ञानार्जन; रात्रशाळेतील 277 महिला व मुलींचा सहभाग


दिवसभर कष्ट, रात्री शिक्षण अन्‌ मैदानात दांडियाचा रंग!; शिक्षणासोबत धार्मिक व सांस्कृतिक आनंदाचा संगम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवसभर अर्थार्जनाची धावपळ, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे आणि रात्री शिक्षण घेऊन स्वतःच्या भविष्याला आकार देण्याची जिद्द… अशा संघर्षमय दिनचर्येतून वेळ काढत ज्ञानार्जन करणाऱ्या महिला व युवतींनी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दांडिया आणि रास-गरबाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थिनी, महिला आणि शिक्षिकांनी दांडियाच्या तालावर ठेका धरत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम रंगला होता.


रात्रशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना विविध सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा आणि शिक्षणाच्या प्रवासात आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने नवरात्रोत्सवानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्रशाळेत एकूण 589 विद्यार्थी प्रवेशित असून, त्यापैकी 277 महिला व मुली आहेत. दिवसभर विविध जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनींनी कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष ॲड. अनंत फडणीस, रात्रशाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी आणि रात्रशाळेच्या माजी चेअरमन ज्योतीताई कुलकर्णी पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य माहेश्वरी गावित उपस्थित होते. यावेळी शहरातील दिवसाच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या महिला प्राचार्या, मुख्याध्यापिका आणि शिक्षिकांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये महर्षी ग. ज. चीतांबर विद्या मंदिरच्या प्राचार्य मंदा शिंदे, पर्यवेक्षिका कल्पना काळोखे, सौ काळे मॅडम,माजी मुख्याध्यापिका निर्मला भंडारी, मेहेर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुरीता झगडे, बीएड कॉलेजचे माजी प्राचार्य रवींद्र चोभे, भाजपचे माजी नगरसेवक सचिन पारखी, सरस्वती नाईट हायस्कूलच्या विना कुऱ्हाडे आणि धारूरकर मॅडम यांच्यासह दिवसाच्या शाळांमधील अनेक महिला मुख्याध्यापिका व शिक्षक उपस्थित होते. शहरातील अनेक महिला मुख्याध्यापिका यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.


रात्रशाळेचे प्राचार्य सुनील सुसरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्व पाहुण्यांना तुळशीचे रोप भेट देण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रात्रशाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी म्हणाले की, भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी समाजात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी मिळविलेले यश संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नांच्या दिशेने भरारी घेता यावी, यासाठी त्यांच्या पंखांत बळ निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रात्रशाळा करीत आहे. रात्रशाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून एक परिवार आहे. या परिवारातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच विविध सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, त्यांच्यात आपुलकीची भावना वाढावी आणि त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या हेतूने अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते, असेही डॉ. कोठारी यांनी नमूद केले.
शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिकांचे रात्रशाळेच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे. त्यांच्या सहकार्यामुळे शहरातील शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी रात्रशाळेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करता येत आहेत. या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील महिला मुख्याध्यापिकांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.


शाळेच्या मैदानात आयोजित दांडिया व रास-गरबाच्या कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनींनी नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. शिक्षकांनीही विद्यार्थिनींसोबत दांडियाचा आनंद घेतला. संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही या उत्सवात सहभाग घेतला. दांडियाच्या तालावर थिरकणाऱ्या युवतींचा उत्साह, रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा आणि उपस्थितांच्या आनंदी वातावरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता.


दिवसभर कष्ट करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी या उपक्रमातून देण्यात आली याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अनंत देसाई,मानद सचिव सुमतीलाल कोठारी व माजी मानद सचिव संजय जोशी यांनी कौतुक करून आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षिका वृषाली साताळकर, स्वाती होले आणि अनुराधा दरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनातून नवरात्रोत्सवाचा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *