पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार; श्रमदान, मृदसंधारण आणि शेतीतील ओलावा संवर्धनावर भर
लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण, मृदसंधारण आणि शेतीतील ओलावा संवर्धनाला चालना देण्यासाठी पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने ‘नाम-सेवा’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या शेतकरीसेवेच्या कार्यातून प्रेरणा घेऊन श्रमदान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे करण्यावर या उपक्रमात भर देण्यात येणार आहे. नगर तालुक्यातील वाळुंज येथून या मोहिमेची सुरुवात करण्याचे नियोजन असून, दख्खन पठारावरील दुष्काळप्रवण भागांत पाणी आणि जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी जनसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
या संकल्पनेत श्रमदान, शेतीतील पाणी व्यवस्थापन आणि वृक्षसंवर्धन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, जलसंधारण आणि ग्रामीण भागातील विविध सामाजिक उपक्रमांसाठी योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन शेतकरी आणि ग्रामीण समुदायाच्या पाणीविषयक प्रश्नांवर प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून काम करण्याची भूमिका पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेने घेतली आहे.
‘नाम-सेवा’ या उपक्रमातून केवळ श्रद्धांजलीपुरते मर्यादित न राहता श्रमदान, पाण्याचे योग्य नियोजन आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यांसारख्या कृतींना प्राधान्य देण्याचा विचार मांडण्यात आला आहे. गावातील नागरिक, शेतकरी, युवक, महिला आणि स्वयंसेवक यांच्या सहभागातून स्थानिक गरजांनुसार कामे करण्याचे नियोजन आहे.
पावसाचे पाणी वेगाने वाहून जाण्याऐवजी ते योग्य ठिकाणी अडवून जमिनीत मुरविणे, शेतातील मातीची धूप कमी करणे आणि पिकांच्या मुळांजवळील ओलावा टिकविणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्देश आहेत. यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार शेतबांधांची देखभाल, समतल चर, लहान जलसंधारण रचना आणि गाळ अडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा विचार करण्यात येणार आहे. पाण्याचे नियोजन करताना जमिनीचा उतार, मातीचा प्रकार, खडकांची रचना, पर्जन्यमान आणि भूजलपातळी यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना निश्चित करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
पाणीटंचाईच्या काळात पिकांना उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर करणे गरजेचे आहे. यासाठी पिकांचे अवशेष जमिनीवर आच्छादन म्हणून वापरणे, मातीतील ओलावा जपणे, अनावश्यक बाष्पीभवन कमी करणे आणि गरजेनुसार ठिबक सिंचनासारख्या पद्धतींचा अवलंब करणे उपयुक्त ठरू शकते. ‘ईर्जिक फार्मिंग’ या संकल्पनेच्या माध्यमातून शेती, जलसंधारण आणि जमिनीतील ओलावा संवर्धन यांचा परस्परसंबंध लक्षात घेऊन काम करण्याचा विचार मांडण्यात आला आहे. स्थानिक परिस्थितीनुसार तांत्रिक मार्गदर्शन घेऊन उपलब्ध पाणी आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.
भूजल स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, भूजल पुनर्भरणाला चालना देणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारणाच्या रचनांची निर्मिती करण्याबरोबरच त्यांची नियमित देखभालही महत्त्वाची आहे. या उपक्रमांतर्गत कामांचा परिणाम समजून घेण्यासाठी पावसाचे प्रमाण, जमिनीतील ओलावा, विहिरींच्या पाणीपातळीतील बदल आणि वृक्षांच्या वाढीची नोंद ठेवण्याची पद्धत विकसित करणे उपयुक्त ठरेल. अशा नोंदींच्या आधारे जलसंधारणाच्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष फायदा किती झाला, हे समजण्यास मदत होऊ शकणार आहे.
नगर तालुक्यातील वाळुंज येथे लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथील अनुभव, स्थानिक गरजा आणि कामांचे परिणाम लक्षात घेऊन पुढील टप्प्यांत दख्खन पठारावरील इतर दुष्काळप्रवण गावांमध्येही अशा उपक्रमांचा विस्तार करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी केवळ पावसावर अवलंबून न राहता पावसाच्या पाण्याचे नियोजन, जमिनीतील ओलावा संवर्धन, वृक्षांचे संरक्षण आणि सामूहिक श्रमदान यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. ‘नाम-सेवा’ उपक्रमाच्या माध्यमातून याच दिशेने लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.

