आरोग्य शिबिर, रक्तदानासह विविध धार्मिक-सामाजिक उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या नवरात्रोत्सवासाठी देवस्थान ट्रस्टकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, दरवर्षी शहरासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील कायदा व सुव्यवस्था तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी श्री रेणुका माता देवस्थान मंदिराची पाहणी केली. यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली. भाविकांची गर्दी, वाहतूक व्यवस्था, मंदिर परिसरातील शिस्त, सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या बंदोबस्ताबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असल्याने गर्दीचे नियोजन, वाहनांची ये-जा आणि भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्यावर बैठकीत भर देण्यात आला. नवरात्रोत्सवाची सुरुवात रविवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी देवीची मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठापना करण्याने होणार आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांसाठी विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, होमहवन, आकर्षक विद्युत रोषणाई, देवीचा गोंधळ तसेच महाप्रसाद आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाला धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक उपक्रमांचीही जोड मिळणार आहे. भाविकांना दर्शनासाठी येताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने सर्वांनी प्रशासन व देवस्थान ट्रस्टला सहकार्य करून शिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या बैठकीस देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसोबतच आरोग्य, रक्तदान आणि पर्यावरण संवर्धनासारखे सामाजिक उपक्रम राबवून श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टने उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली जात आहे.

