पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा फाटा येथील दादासाहेब घाडगे पाटील विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत निमगाव वाघा (ता. नगर) येथील संदेश नवनाथ जाधव याने आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संदेश जाधव याने 19 वर्षे वयोगटातील 97 किलो वजनगटात प्रतिस्पर्ध्यांना चुरशीची लढत देत उत्कृष्ट कामगिरी केली. ताकद, चपळाई आणि कुस्तीतील डावपेचांचा प्रभावी वापर करत त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. संदेश जाधव हा निमगाव वाघा येथील रहिवासी असून, तो टाकळी खातगाव येथील हनुमान विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच कुस्तीच्या सरावावर सातत्याने लक्ष केंद्रित करत त्याने जिल्हास्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आता पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेतही दमदार कामगिरी करण्याचे त्याचे ध्येय आहे.
पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करमाळा (जि. सोलापूर) येथे करण्यात आले आहे. संदेश जाधव याला नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे तसेच क्रीडा शिक्षक मिलिंद थोरे यांचे मार्गदर्शन लाभत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संदेश सातत्याने सराव करत आहे. संदेशच्या या यशाबद्दल हनुमान विद्यालयाचे प्राचार्य बाकसे तसेच विद्यालयातील शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.

