• Sat. Oct 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात महात्मा गांधी-लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

ByMirror

Oct 2, 2026
व्यसनमुक्ती, प्लास्टिकमुक्ती व स्वच्छतेची सामूहिक शपथ

‘स्वच्छतेतून सक्षम भारताचे दर्शन घडेल’ -पै. नाना डोंगरे


व्यसनमुक्ती, प्लास्टिकमुक्ती व स्वच्छतेची सामूहिक शपथ


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामपंचायत कार्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या विचारांचा जागर करत गावातील सार्वजनिक स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती आणि व्यसनमुक्तीचा संकल्प करण्यात आला.


ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. त्यानंतर ग्रामस्थांनी सार्वजनिक स्वच्छता राखणे, परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच व्यसनांपासून दूर राहण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, किरण जाधव, दीपक जाधव, भगवंत केदार, भाऊसाहेब जाधव, अतुल फलके, सुरेश काळे, गणेश येणारे, नामदेव भुसारे, गोरख वाबळे, सोमनाथ आतकर आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, “महात्मा गांधींनी दाखविलेला सत्य आणि अहिंसेचा मार्ग आजही भावी पिढीसाठी दिशादर्शक आहे. महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतल्यास जीवनाला सकारात्मक दिशा मिळते.” लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत देशाच्या विकासाला दिशा देण्याचे काम केले. त्यांचे साधेपण, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेची भावना आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


महात्मा गांधी यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता हीच खरी सेवा असून, प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता आणि व्यसनमुक्तीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला हातभार लागेल. स्वच्छतेच्या संस्कारातून संपूर्ण जगाला सक्षम आणि स्वच्छ भारताचे दर्शन घडेल, असा विश्‍वासही पै. नाना डोंगरे यांनी व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *