• Fri. Oct 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

एमआयडीसी परिसरातील अवैध धंदे त्वरीत बंद करा; रिपाइं महिला आघाडी आक्रमक

ByMirror

Oct 2, 2026
एमआयडीसी पोलिसांना निवेदन

अन्यथा 5 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा; हातभट्टी, मटका, जुगार, गांजा, मावा विक्रीवर कारवाईची मागणी


एमआयडीसी पोलिसांना निवेदन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी हद्दीतील विविध गावांमध्ये हातभट्टी दारू, गांजा, मावा, बिंगो, सोरट, मटका, जुगार यांसह अन्य अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर व खुलेआम सुरू असल्याचा आरोप करीत हे सर्व धंदे तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या अवैध व्यवसायांमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले असून, युवक व्यसनाधीन होत असल्याचा दावा महिला आघाडीने केला आहे.


यासंदर्भात रिपाइं महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांची भेट घेऊन निवेदन दिले. एमआयडीसी हद्दीतील सर्व गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी रिपाइं महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, रेश्‍मा जाधव, मनीषा गायकवाड, सोनाली साळवे, शितल नाटीकर, धोंडाबाई हिरवटे, शितल जाधव आदी उपस्थित होत्या.


महिला आघाडीच्या म्हणण्यानुसार, एमआयडीसी परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हातभट्टी दारू, जुगार, बिंगो, सोरट, मटका, गांजा व मावा विक्रीसारखे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. हे व्यवसाय चालविणाऱ्यांमध्ये कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नसून, ते उघडपणे आपले व्यवसाय करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
या अवैध धंद्यांचा सर्वाधिक परिणाम सर्वसामान्य कुटुंबांवर होत असल्याचे महिला आघाडीने म्हटले आहे. एमआयडीसी परिसरातील अनेक कुटुंबे रोजंदारीवर अवलंबून आहेत. दिवसभर कष्ट करून मिळणाऱ्या पैशातून घरातील चूल पेटते. मात्र, कामावरून घरी परतताना काही युवक व नागरिक हातभट्टीच्या अड्ड्यांवर जाऊन दारूचे सेवन करतात आणि कष्टाने कमावलेला पैसा व्यसनाधीनतेमध्ये खर्च करतात. परिणामी घरातील आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होत असून, कुटुंबातील महिलांना व मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


दारूच्या व्यसनामुळे काही कुटुंबांमध्ये घरगुती वाद आणि मारहाणीच्या घटना वाढत असल्याचा आरोपही महिला आघाडीने केला आहे. हातभट्टी दारूच्या व्यवसायामुळे युवकांचे संसार उद्ध्वस्त होत असून, काही युवकांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रीसह इतर सर्व अवैध धंद्यांविरोधात पोलिस प्रशासनाने ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई करणे गरजेचे असल्याचे महिला आघाडीने म्हटले आहे.


एमआयडीसी हद्दीतील गावांमध्ये हातभट्टी दारूसोबतच मटका, जुगार, बिंगो, सोरट, गांजा आणि मावा विक्रीचे व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करीत या सर्व प्रकारांवर पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केवळ अधूनमधून कारवाई न करता हे व्यवसाय कायमस्वरूपी बंद होतील, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सर्व गावांमधील अवैध धंदे दोन दिवसांत तातडीने बंद करण्यात यावेत, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने 5 ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *