‘मावा विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करा’; आरपीआय महिला आघाडीचा पोलिस प्रशासनाला इशारा
मावा विक्री बंद न केल्यास 6 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मावा विक्री सर्रास सुरू असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. मावा विक्रीवर तात्काळ कारवाई करून युवकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराला आळा घालावा, तसेच मावा विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची व त्यामागील यंत्रणेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आरपीआय महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हे निवेदन दिले. यावेळी शितल नाटेकर, रेश्मा जाधव, प्रियंका पठारे, डॉ. सीताबाई भिंगारदिवे, जयाताई गायकवाड, आरती बडेकर, छायाताई बडेकर, अश्विनी झोंड, सुनीता घोडके, अनिता पंडित, शारदा बागुल आदी महिला उपस्थित होत्या.
नगर शहरासह विविध भागांत मावा विक्रीवर निर्बंध असताना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मावा विक्री कशाच्या आधारावर सुरू आहे, असा प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही महिला आघाडीने केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माव्याच्या व्यसनामुळे अनेक युवक त्याच्या आहारी जात असून आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मावा विक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली होती. मात्र, काही काळानंतर एमआयडीसी परिसरात पुन्हा मावा विक्री सुरू झाल्याने युवकांमध्ये मावा सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचा दावा महिला आघाडीने केला आहे.
मावा विक्री करणाऱ्या ठिकाणांचे तसेच मावा विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे फोटो आपल्याकडे पुरावा म्हणून असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित वाहनांची चौकशी केल्यास मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, मशीन तसेच सुगंधी तंबाखूचा पुरवठा कुठून होतो, याचा शोध लागू शकतो. त्यामुळे केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता मावा तयार करणारे अड्डे शोधून ते उद्ध्वस्त करण्याची मागणी महिला आघाडीने केली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मावा विक्री तातडीने बंद करण्यात यावी. युवकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी ज्योती पवार यांनी केली. मावा विक्रीवर प्रभावी कारवाई न झाल्यास 6 ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर महिलांच्या सहभागातून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

