• Fri. Oct 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

महात्मा गांधी जयंतीला ‘रोजी आणि निवारा राष्ट्रीय क्रांती ’साठी ‘लोकशाहीमान्य डोंगरी औद्योगिक वसाहत’ प्रस्ताव.

ByMirror

Oct 2, 2026
महात्मा गांधी जयंतीला ‘रोजी आणि निवारा राष्ट्रीय क्रांती ’साठी ‘लोकशाहीमान्य डोंगरी औद्योगिक वसाहत’ प्रस्ताव.

पारेगाव खुर्द, संगमनेर येथे पहिली आदर्श वसाहत विकसित करण्याची मागणी; ग्रामीण शिक्षित बेरोजगारांसाठी प्रदूषणमुक्त उद्योगांवर भर देण्याचा संकल्प


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुष्काळप्रवण भागांमध्ये शिक्षित बेरोजगारांना रोजगार आणि परवडणारा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकशाहीमान्य डोंगरी औद्योगिक वसाहत’ ही संकल्पना राबविण्याचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी मांडला आहे. ‘रोजी आणि निवारा’ हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असून, पारेगाव खुर्द, ता. संगमनेर येथे पहिली आदर्श वसाहत विकसित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


पारेगाव खुर्द येथे रावसाहेब घुगे या नवउद्योजकाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युनिट उभारले असून, त्यातून 250 हून अधिक आयटी क्षेत्रातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्याचे ॲड. गवळी यांनी सांगितले. ग्रामीण भागातील हा औद्योगिक पुढाकार प्रस्तावित डोंगरी औद्योगिक वसाहतीसाठी महत्त्वाचा प्रारंभबिंदू ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले. रोजगाराच्या साधनांशिवाय केवळ घरे उभारणे अर्थपूर्ण ठरणार नाही. प्रथम उपजीविकेची संधी आणि त्यासोबत सुरक्षित, परवडणारा निवारा उपलब्ध झाला पाहिजे. म्हणूनच ‘रोजी आणि निवारा’ ही आमच्या संकल्पनेची मूलभूत दिशा आहे,” असे ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले.


लागवडीखाली नसलेल्या डोंगराळ जमिनींपैकी पर्यावरणीयदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य जमिनींचा उद्योग व निवासासाठी नियोजनबद्ध उपयोग व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. जमिनीची मालकी, कायदेशीर स्वरूप, आवश्‍यक परवानग्या, पाण्याची उपलब्धता आणि जलसंधारणाचे महत्त्व विचारात घेऊन प्रकल्प विकसित करावेत. विशेषतः दुष्काळप्रवण भागांमध्ये कमी पाणी वापरणाऱ्या प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य असावे, असे त्यांनी सांगितले.


शिर्डी विमानतळ पारेगाव खुर्दपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असल्याचे ॲड. गवळी यांनी नमूद केले. विमानतळाची जवळीक उद्योगविकासासाठी अनुकूल ठरू शकते. त्यासोबत विश्‍वासार्ह वीजपुरवठा, वेगवान इंटरनेट, रस्ते, कामगारांसाठी वाहतूक आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या सुविधा विकसित करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग, पारदर्शक नियोजन आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी या आधारांवर वसाहत विकसित व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उद्योग आणि निवास यांची सांगड घालून पारेगाव खुर्दची ‘लोकशाहीमान्य डोंगरी औद्योगिक वसाहत’ महाराष्ट्रातील ग्रामीण व दुष्काळप्रवण भागांसाठी विकासाचा आदर्श ठरावी, हा या प्रस्तावाचा उद्देश असल्याचे ॲड. गवळी यांनी सांगितले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *