• Tue. Sep 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत राजलक्ष्मीने उंचावले अहिल्यानगरचे नाव

ByMirror

Sep 29, 2026
राष्ट्रीय रँक प्राप्त करुन उमटवला नेमबाजीत कौशल्याचा ठसा

राष्ट्रीय रँक प्राप्त करुन उमटवला नेमबाजीत कौशल्याचा ठसा


अवघ्या आठ महिन्यांच्या सरावात जिल्हा, राज्य ते राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. राजलक्ष्मी अशोक घडेकर हिने भोपाळ (मध्य प्रदेश) येथे राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) यांच्या वतीने आयोजित 28 व्या कुमार सुरेंद्र सिंग आंतरशालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत तिने हजारो स्पर्धकांमधून राष्ट्रीय रँक मिळवला असून, तिने 372 गुणांक प्राप्त केला आहे.


विशेष म्हणजे राजलक्ष्मीने रायफल शूटिंगचा सराव केवळ मागील आठ महिन्यांपासून सुरू केला आहे. या अल्प कालावधीत तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत मेडल मिळवले, त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आणि आता राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय यश संपादन केले. रायफल शूटिंग हा एकाग्रता, अचूकता, संयम आणि मानसिक स्थैर्याची आवश्‍यकता असलेला खेळ असून, अल्पावधीत तिने या खेळातील कौशल्य आत्मसात केले आहे. गोवा येथे झालेल्या 13 व्या वेस्ट झोन रायफल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने अजिंक्यपद पटकावले आहे.


राजलक्ष्मीने अहिल्यानगर सिटी रायफल अँड पिस्तोल स्पोर्ट्‌स शूटिंग क्लब येथे प्रशिक्षण घेतले असून तिला प्रशिक्षक आलिम शेख, छबुराव काळे आदींचे मार्गदर्शन लाभले. “रायफल शूटिंगमध्ये अचूक नेम साधण्यासाठी एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असते. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीमध्ये अबॅकसच्या सततच्या सरावामुळे माझी एकाग्रता वाढण्यास मदत झाली आणि त्याचा फायदा मला रायफल शूटिंगमध्ये झाला. त्यामुळे अकॅडमीच्या माझ्या सर्व शिक्षिकांची मी आभारी आहे. पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी सुरू असून, भारताचे प्रतिनिधित्व करत उत्तुंग यश मिळवण्याचा माझा संकल्प असल्याचे राजलक्ष्मी हिने म्हंटले आहे.
कु. राजलक्ष्मीच्या यशाबद्दल श्रीगोंदा तालुका कृषी सेवा संघाचे पदाधिकारी व संचालक मंडळ, एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीचे संचालक मंडळ तसेच भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *