हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश;
सार्वजनिक बांधकाम विभागाचे भांडारपाल संजय भिंगारदिवे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
वर्षभर ऐतिहासिक स्थळे आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ग्रुपचे सदस्य प्रयत्नशील -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शहराच्या ऐतिहासिक चांदबिबी महाल परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याबरोबरच परिसराचे पर्यावरण संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमात चांदबिबी महाल परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच परिसरातील स्वच्छता करून पर्यटकांना स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक परिसर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऐतिहासिक स्थळे ही केवळ पर्यटनाची केंद्रे नसून आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख असल्याने त्यांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, विकास भिंगारदिवे, जहीर सय्यद, सचिन चोपडा, अशोक पराते, सुंदरराव पाटील, सर्वेश सपकाळ, ताराचंद ठोकळ, विलास आहेर, दिलीप ठोकळ, अशोक लोंढे, दिलीप गुगळे, अभिजीत सपकाळ, दीपकराव धाडगे, मनोहर दरवडे, योगेश चौधरी, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, अविनाश जाधव, शेषराव पालवे, जोगिंदरसिंग, सखाराम अळकुटे, अविनाश पोतदार, सुभाष पेंढुरकर, सरदारसिंग परदेशी, इंजि. अनिल सोळसे, दीपकराव घोडके, उमाशंकर सिंग, दीपकराव मेहतानी, दीपक अमृत, विशाल भामरे आदींसह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य संजय भिंगारदिवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात भांडारपाल म्हणून तब्बल 30 वर्षे सेवा बजावली. त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक व सेवाभावी कार्याची दखल घेत जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचा सेवापूर्तीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांना गौरविण्यात आले.
संजय सपकाळ म्हणाले, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. ऐतिहासिक चांदबिबी महाल हा अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबवून पर्यटनस्थळांचे संवर्धन करण्याचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. केवळ जागतिक पर्यटन दिनापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता वर्षभर ऐतिहासिक स्थळे आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ग्रुपचे सदस्य प्रयत्नशील असून, या मोहिमेत नागरिकांनी देखील पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
विकास भिंगारदिवे म्हणाले की, पर्यटनस्थळाचा विकास केवळ भौतिक सुविधा निर्माण करून होत नाही, तर तेथील स्वच्छता, हिरवाई आणि ऐतिहासिक वारशाचे जतनही तितकेच महत्त्वाचे आहे. चांदबिबी महाल परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियानातून हरदिन मॉर्निंग ग्रुप समाजात सकारात्मक संदेश देत आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरात एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना संजय भिंगारदिवे म्हणाले, “सार्वजनिक बांधकाम विभागात 30 वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी समाधानाचा आणि अभिमानाचा विषय आहे. सेवाकाळात प्रामाणिकपणे काम करण्याचा सदैव प्रयत्न केला. या सेवापूर्तीनंतर हरदिनच्या सामाजिक चळवळीत सातत्याने जोडून सामाजिक योगदान देण्याचा त्यांनी संकल्प केला.

