हैदराबाद राष्ट्रीय पोलीस कराटे स्पर्धेत सुवर्णपदक
ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आयडियल मार्शल आर्ट्स, अहिल्यानगरचे प्रतिभावान कराटेपटू आणि सध्या पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले अनिकेत बिटला यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत अहिल्यानगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय पोलीस कराटे स्पर्धेत अनिकेत बिटला यांनी सुवर्णपदक पटकावले. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांची ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पोलीस कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विविध राज्यांतील पोलीस खेळाडूंचा सहभाग असताना अनिकेत यांनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत सुवर्णपदक मिळविले. त्यांच्या या कामगिरीमुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. अनिकेत बिटला हे केवळ कराटेपुरते मर्यादित नसून ज्युदो, तायक्वांदो आणि वुशू या मार्शल आर्ट्स क्रीडा प्रकारांमध्येही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखले जातात.
अनिकेत बिटला यांच्या या यशाबद्दल आयडियल मार्शल आर्ट्स ग्रुपच्या वतीने वाडिया पार्क क्रीडा संकुलात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षक, मार्गदर्शक, राष्ट्रीय पंच तसेच राष्ट्रीय खेळाडूंनी अनिकेत यांच्या यशाचे कौतुक करून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य प्रशिक्षक व मार्गदर्शक घनश्याम सानप, अनिकेतचे प्रशिक्षक धर्मनाथ घोरपडे, कराटे संघटनेचे सचिव व मार्गदर्शक अमोल काजळे, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक दीपक धनवटे, राष्ट्रीय पंच सचिन कोतकर, राष्ट्रीय खेळाडू सतीश शिंदे, राष्ट्रीय खेळाडू रोहित काळे आणि राष्ट्रीय खेळाडू ओम सानप आदी उपस्थित होते.

